इंदापूर तालुक्यातील अवैध वाळू चोरी करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई : धन्यकुमार गोडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 09:45 PM2021-06-05T21:45:56+5:302021-06-05T21:46:55+5:30
२५ पेक्षा जास्त वाळुचोरांवर होणार तडीपारीची कारवाई; अवैध वाळु व्यावसायिकांचे दणाणले धाबे..
बाभुळगाव: पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्यांची जीवनदायिनी असलेल्या उजनी जलाशयातील अवैध वाळु तस्करांच्या वाळु चोरीला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी इंदापूरपोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. भविष्यात इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत वाळु चोरी करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी बोलताना दिली.
इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत एकपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या वाळु तस्करांच्या गुन्ह्यांची तपासणी करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.भविष्यातही त्यांनी वाळु चोरीचे प्रकार तसेच सुरू ठेवल्यास अशा वाळु तस्करांची यादी बनवुन त्यांच्यावर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाईची तयारी इंदापूर पोलिसांकडुन सुरू आहे. वाळु चोरीला कायमचा लगाम घाण्यासाठी मोक्का कायद्याचा वापर करून गुन्हेगारांच्या टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी इंदापूर पोलिसांनी कंबर कसली आहे.भविष्यात अवैध वाळु तस्करीचा बिमोड करण्यासाठी पोलीसांकडुन कठोर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.तर कारवाईच्या भीतीने वाळु तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पूर्वी एक पेक्षा जास्त वाळुचोरीचे गुन्हे दाखल असलेल्या इंदापूर तालुक्यातील व तालुक्याबाहेरील २५ पेक्षा जास्त वाळुतस्करांवर तडीपार कारवाईची प्रक्रीया पुर्ण झाली असुन, याबाबत वरिष्ठ पातळीवरून आदेश प्राप्त होताच इंदापुर पोलिसांकडुन २५ पेक्षा जास्त वाळु चोरांना तडीपार करण्यात येणार असल्याचे धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले. तर भविष्यात उजनी जलाशय परिसरातील अवैध वाळु चोरी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडुन कायद्याची कडक अंमलबजावणी करतानाच अवैध वाळु तस्करांचे जाळे उध्वस्त करण्यात येणार असल्याचे सांगितले.
—