पप्पू गावडे खून प्रकरणातून गजा मारणे याची मोक्का न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 04:42 PM2021-02-12T16:42:33+5:302021-02-12T16:44:44+5:30
जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातील टोळीचे आर्थिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तसेच पूर्वीच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी पप्पू उर्फ संतोष हिरामण गावडे याचा खून झाला होता...
पुणे : जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातील टोळीचे आर्थिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तसेच पूर्वीच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी पप्पू गावडे खून प्रकरणामध्ये पौड येथे गुन्हा दाखल असलेल्या गजानन मारणे सह इतर आरोपींची पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
विशेष मोक्का न्यायाधीश ए वाय थत्ते यांनी हा निकाल दिला असून, पुराव्याच्या अभावी आरोपींची मुक्तता केली असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे ऍड सुधीर शहा, ऍड विजयसिंह ठोंबरे, ऍड विपुल धुशिंग व ऍड जितू सावंत, ऍड विद्याधर कोशे, ऍड भरेकर यांनी कामकाज पाहिले.
गजानन मारणे ( वय ४९), पप्पू उर्फ अतुल लक्ष्मण कुडले (वय ३०), रूपेश कृष्णराव मारणे, संतोष विश्वनाथ शेलार, सुनील नामदेव बनसोडे, गणेश नामदेव हुंडारे ( वय ३२), प्रदीप दत्तात्रय कंधारे (वय २८), अनंता ज्ञानोबा कदम (वय ३०), बाब्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार (वय २७), बापू श्रीमंत बागल (वय ३०), गोरक्षनाथ तुकाराम हाळंदे (वय ३०), यशवंत उर्फ बाळा दासू बोकेफोडे (वय ३०), उमेश नागु टेमधरे, सतीश उर्फ आबा शिळीमकर अशी निर्दोष सुटका केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निलेश ज्ञानेश्वर जाधव यांनी पौड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.
मौजे लवळे गावाच्या हददीतील गावडे वस्तीजवळ ३ नोव्हेंबर २०१४ मध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातील टोळीचे आर्थिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तसेच पूर्वीच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी पप्पू उर्फ संतोष हिरामण गावडे याचा खून झाला होता. निलेश घायवळ आणि गजानन मारणे हे दोघे पूर्वीपासून आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारी टोळ्या चालवितात. या दोन्ही टोळ्यांमध्ये फार पूर्वीपासून कोथरूड व मुळशी तालुक्यातील जमिनीचे खरेदी विक्री चे जुने वाद असून, या वादावरून व आर्थिक वर्चस्वावरून मारणे व घायवळ यांच्या टोळ्यांनी एकमेकांवर खुनी हल्ले केले आहेत. २००८ मध्ये निलेश घायवळ व पप्पू उर्फ संतोष गावडे यांच्यावर गजानन मारणे , पप्पू कुडले व त्यांच्या साथीदारांनी फायरिंग करून व कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी पप्पू गावडे याने दिलेल्या फिर्यादीवरून, कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात साक्ष दिली तर तुला संपवून टाकू अशी धमकी त्यांनी पप्पू गावडे याला दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी पप्पूचा काटा काढला. यामध्ये आरोपी श्रीकांत उर्फ बाब्या संभाजी पवार याने गुन्हयात वापरलेला चोपर, कोयता व इतर १ कोयता जप्त करण्यात आला होता.
.......