सोनकसवाडी दरोड्यातील टोळीवर मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:12 AM2021-05-26T04:12:25+5:302021-05-26T04:12:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मोरगाव : पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील चौदा गावांत पाच दरोडेखोरांच्या टोळीने गेल्या काही वर्षांपासून उच्छाद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मोरगाव : पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील चौदा गावांत पाच दरोडेखोरांच्या टोळीने गेल्या काही वर्षांपासून उच्छाद मांडला होता. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनकसवाडी येथे १६ फेब्रुवारीला या टोळक्याने दरोडा टाकला होता. संबंधित टोळीवर मोक्काअंतर्गत गुन्हा पारीत करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.
सोनकसवाडी येथे १६ फेब्रुवारीला एका बंद घरात घरफोडी व आणखी एका खोलीतील व्यक्तीस चाकूचा धाक दाखवून २ लाख १६ हजार रुपये लुटले होते. याप्रकरणी अजय शरद भोसले (रा. नेर, ता. खटाव), दादा हनुमंत चव्हाण गाववडी (विसापूर, ता खटाव), विकास किरण शिंदे (रा . नांदल, ता फलटण जि . सातारा), रावश्या कोब्या काळे (रा लासुर्णे, ता. इंदापूर), कॅसेट ऊर्फ काशीनाथ ऊर्फ भीमराव भोसले (रा. आंदरुड, ता. फलटण) यांना अटक करून १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तर या दरोड्यातील आरोपी लखन पोपट भोसले वडगाव जयराम स्वामी हा फरारी आहे. या टोळक्यावर सोनकसवाडी, बारामती शहर तसेच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, करमाळा सातारा जिल्ह्यातील लोणंद, सातारा, फलटण आदी चौदा ठिकाणी बलात्कार, दरोडा, जबरी चोरी यांसारखे २६ गुन्हे दाखल आहेत. सोनकसवाडी येथे झालेल्या दरोड्याप्रकरणी गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कार्यवाही होण्याबाबतचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांकडे वडगाव निंबाळकर पोलिसांकडून पाठवला होता. त्यानुसार हा ठराव मंजूर करत त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. बारामती विभागात आत्तापर्यंत १९ टोळीतील १२५ आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे.