जबरी चोरी, घरफोडी आणि वाहनचोरी करणा-या गुन्हेगारांच्या टोळीवर 'मोक्का' ; तब्ब्ल ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 05:53 PM2021-04-23T17:53:38+5:302021-04-23T17:54:04+5:30
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हे दाखल
पुणे: जबरी चोरी, घरफोडी आणि वाहनचोरी करणा-या गुन्हेगारांच्या टोळीवर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन विरोधी पथकाने मोक्का कारवाई केली आली. आरोपींकडून वाहने आणि जबरी चोरीतील ८ लाख ४६ हजार १०० रूपये
किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हे दाखल आहेत.
अजिनाथ लक्ष्मण गायकवाड (वय २४, रा. हडपसर), नागेश मनोहर वाकडे (वय २१, रा. हडपसर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ९ एप्रिलला फिर्यादी हे महम्मदवाडी हडपसर येथून दुचाकीने घरी चालले असता अजिनाथ गायकवाड व नागेश वाकडे यांच्या तीन साथीदारांनी दुचाकीवरून फिर्यादीच्या मागे येत त्यांच्या दुचाकीला कट दिला. त्यांना थांबवून कोयत्याचा धाक दाखवत शिवीगाळ करून फिर्यादीच्या खिशातील १२०० रूपये, ११०० रूपयांची चांदीची अंगठी असे हिसकावून पळून गेले. याप्रकरणी फिर्यादी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दरोडा व वाहन विरोधी पथक २ गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप यांनी या गुन्हयाचा तपास सुरू केला. या गुन्हयात दोघांना अटक करण्यात आली. जिल्हयात आणि महाराष्ट्रातील इतर जिल्हयात संघटितपणे गुन्हे करून दहशत पसरून स्वत:च्या आणि टोळीच्या आर्थिक फायद्याकरिता खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. दोन्ही आरोपींवर अनुक्रमे १५ आणि ३ गुन्हे दाखल आहेत. दरोडा व वाहन विरोधी पथक २ चे पोलीस उपनिरीक्षक सुनील पंधरकर यांनी आरोपींवर दाखल गुन्हयात मोक्का कलमांचा समावेश करावा असा अहवाल पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाटगे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्याकडे सादर केला होता. त्याला मान्यता देत आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रशासन सुधाकर यादव करत आहेत.