निर्विघ्न गणेशोत्सवासाठी ‘मॉक ड्रिल’
By admin | Published: September 9, 2016 02:04 AM2016-09-09T02:04:49+5:302016-09-09T02:04:49+5:30
यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पाडण्यासाठी कंबर कसलेल्या पोलिसांनी मंडळांसह संवेदनशील ठिकाणांची कसून तपासणी सुरू केली आहे.
पुणे : यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पाडण्यासाठी कंबर कसलेल्या पोलिसांनी मंडळांसह संवेदनशील ठिकाणांची कसून तपासणी सुरू केली आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून शहरातील तब्बल ३९३ ठिकाणांवर तपासणी करण्यात आली आहे, तर एनएसजीकडून दोन ठिकाणी आणि शीघ्र कृती दलाकडून सात ठिकाणी मॉकड्रिल करण्यात आले आहे. पोलिसांनी ६ गुन्हेगारी टोळ्यांच्या ४१ जणांसह एकूण १०० जणांवर हद्दपारीची कारवाई केल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील, आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक साकोरे आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.
गणेशोत्सवाचा बंदोबस्त, सुरक्षा याकडे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सह आयुक्त सुनील रामानंद यांनी विशेष लक्ष घातलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू वर्षात तब्बल ११ गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे, तर आॅगस्ट अखेर सहा विविध गुन्ह्यांमधील ५० गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
आकाश दादासाहेब माने, तेजस चंपालाल उणेचा, नीलेश घायवळ आणि शरद मोहोळ टोळीतील ३१, तर इतर दोन टोळ्यांमधील १० जणांविरुद्ध हद्दपारी करण्यात आली आहे. चोरी, घरफोडी, मारामारी आणि शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या ५९ गुन्हेगारांनाही हद्दपार करण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये २०१५ मध्ये गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्यांचाही समावेश आहे. गेल्या आठ महिन्यांत एकूण ५ हजार ४७० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, तडीपारीचे उल्लंघन केलेल्या १४८ गुन्हेगारांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. बेकायदा दारूविक्री करणाऱ्या २४१ जणांवर दारूबंदी अधिनियम कलम ९३ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.
पोलिसांनी गर्दीची ठिकाणे आणि मुख्य चौकांमध्ये वॉच टॉवर उभारले आहेत. उपायुक्त पी. आर. पाटील आणि दीपक साकोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध मंडळांना भेटी देऊन सुरक्षेची पाहणी केली. दीड दिवसाच्या तब्बल ३० हजार ३२४ घरगुती गणपतींचे आणि एका सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे बुधवारी विसर्जन करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.