संमेलनात साहित्य, संस्कृतीची थट्टा
By admin | Published: October 12, 2016 03:03 AM2016-10-12T03:03:06+5:302016-10-12T03:03:06+5:30
‘साहित्य संमेलनांमध्ये केवळ बडेजावपणा, ऐश्वर्याचे प्रदर्शन केले जाते. त्यातून साहित्य, संस्कृतीची थट्टा केली जाते. त्यामुळे मी संमेलनांकडे फिरकणारही नाही
पुणे : ‘साहित्य संमेलनांमध्ये केवळ बडेजावपणा, ऐश्वर्याचे प्रदर्शन केले जाते. त्यातून साहित्य, संस्कृतीची थट्टा केली जाते. त्यामुळे मी संमेलनांकडे फिरकणारही नाही. आधी भालचंद्र नेमाडेंना अध्यक्ष करा; मग मी विचार करेन. नेमाडे कदापि संमेलनात येणार नाहीत. त्यामुळे माझा प्रश्नच उद्भवत नाही’, अशी टिपण्णी ‘ताम्रपट’कार ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केली.
पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘साहित्य संमेलनांमध्ये ग्रंथप्रदर्शनांमधून कोट्यवधींची उलाढाल होते, हे मोठे बळ आहे; मात्र लेखकांच्या मागण्या अचंबित करणाऱ्या असतात. या मागण्या पूर्ण करून, त्यांचे योगदान काय असते,’ असा सवाल करीत, ‘लेखकांचा खर्च प्रकाशकांनी करायला हवा. संयोजकांनी खर्च करण्याचे कारण नाही; पण सध्याचे संयोजक सधन आहेत’, असे टीकास्त्र पठारे यांनी सोडले. ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्व निकष पूर्ण झाले आहेत. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे असल्याने आता केवळ हा राजकीय इच्छाशक्तीचा मुद्दा आहे,’ असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)