बारामतीत शेतकरी शेतातच अनुभवणार आधुनिक शेती तंत्रज्ञान
By admin | Published: January 10, 2017 02:38 AM2017-01-10T02:38:21+5:302017-01-10T02:38:21+5:30
प्रत्यक्ष ११० एकरांवर प्रयोग केलेले ‘कृषिक’ कृषी व पशुपक्षी प्रदर्शन बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या कृषिविज्ञान
बारामती : प्रत्यक्ष ११० एकरांवर प्रयोग केलेले ‘कृषिक’ कृषी व पशुपक्षी प्रदर्शन बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या कृषिविज्ञान केंद्राच्या मार्फत होणार आहे. या प्रदर्शनात सौरऊर्जेसह कमी पाण्यावर शेती, कमी खर्चाची शेती, फळबाग लागवड यांसह दुग्ध-उत्पादन, फळप्रक्रिया, कृषी पर्यटन आदींच्या प्रात्यक्षिकांसह प्रदर्शन होणार आहे. थेट शेतातच शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. या प्रदर्शनाचा उपयोग महिला शेतकऱ्यांनी अधिकाधिक घ्यावा, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे संयोजक राजेंद्र पवार यांनी सांगितले.
या संदर्भात पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की काही वर्षांपासून ‘कृषिक’ प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. राज्यभरातील तीन ते साडेतीन लाखांहून अधिक शेतकरी या प्रदर्शनात सहभागी होतात. अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी तंत्रज्ञान पाहून त्यांच्या शेती पद्धतीत बदल केला आहे. ग्रामीण भागात शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. यंदा महिला शेतकऱ्यांना अधिक वाव कसा मिळेल, यासाठी सुरुवातीचे दोन दिवस महिला शेतकऱ्यांसह राज्यातील विविध भागांतून आलेल्या ठराविक शेतकऱ्यांना मार्गदर्शन या प्रदर्शनात केले जाणार आहे. दि. १९ ते २२ जानेवारीदरम्यान आयोजित या कृषी प्रदर्शनात कृषी खाते, नाबार्ड, आत्मासह खासगी कृषी कंपन्यांचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कृषी विकास प्रतिष्ठानच्या ११० एकरांवर प्रत्येकी १० गुंठ्यांच्या ९० प्लॉटवर नवीन तंत्रज्ञानावर आधारित कृषीविषयक प्रयोग केले आहेत. त्याचबरोबर, फळबागांमध्येदेखील त्याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रदर्शनात भाजीपाला, फळबाग, पशुपक्षी व्यवस्थापन, स्वयंचलित खत प्रणाली, चारापिके, पॉली हाऊस, फळप्रक्रिया, बीजप्रक्रिया, कृषी पर्यटन, अवर्षणप्रवण भागात यशस्वी ठरलेली शेततळी प्रयोग, कमी पाण्याचा वापर करून चांगली शेती करण्याची पद्धत, शेती तंत्रज्ञान एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार आहे.
साधारणत: राज्यभरात उसाच्या पिकाला महत्त्व दिले जाते. नैसर्गिक अपत्तीच्या काळात पाणी कमी मिळते. त्यामुळे उसाचे पीक कमी पाण्यात कसे घेता येईल, त्याचबरोबर उसाबरोबर आंतरपीक घेणे याचाही अनुभव शेतकऱ्यांना घेता येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
या प्रदर्शनात खिलार, गीर, सहिवाल, थारपारकर, देवनी, लालकंदारी या गोवंशांचेदेखील महत्त्व पटवून दिले जाणार आहे. त्याचबरोबर पशुधन वाचविण्यासाठी मूरघास, हायडोपोनिक्स, चारापिके तंत्रज्ञानदेखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
कृषिविज्ञान केंद्राच्या माध्यमातून आंबा, पेरू, चिकू, डाळिंब, कडधान्य, तेलबिया व धान्य पिकांच्या रोपांची, बियाण्यांची उत्पादने घेतली जातात. त्याचबरोबर नेदरलँड्स सरकारच्या सहकार्याने ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन व्हेजिटेबल’ हा प्रकल्पदेखील कार्यरत आहे. यासह भाजीपाला गुणवत्ता केंद्र आदींची माहिती उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)