तरुणांमध्ये आधुनिक जमातवाद
By Admin | Published: January 9, 2017 03:26 AM2017-01-09T03:26:38+5:302017-01-09T03:26:38+5:30
जगात अस्वस्थता निर्माण झाली असून, आजचा काळ प्रचंड उलथापालथीचा आहे. तरुण मुस्लिम पिढीमध्ये आधुनिक जमातवाद वाढत आहे.
पुणे : जगात अस्वस्थता निर्माण झाली असून, आजचा काळ प्रचंड उलथापालथीचा आहे. तरुण मुस्लिम पिढीमध्ये आधुनिक जमातवाद वाढत आहे. सर्व समस्यांचे निराकरण कुराणमध्येच आहे, असे तरुणांना वाटत असल्यामुळे त्यांच्या एका हातात कॉम्प्युटर आहे; पण दुसऱ्या हातात कुराण आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असा सूचक इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रझिया पटेल यांनी रविवारी दिला.
साधना ट्रस्ट प्रकाशनातर्फे दिवंगत सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई लिखित व मिलिंद चंपानेरकर अनुवादित ‘भारतातील मुस्लिम राजकारण’ आणि ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा लिखित व कुमुद करकरे अनुवादित ‘कालपरवा’ या पुस्तकांचे प्रकाशन रविवारी झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, दलवाई यांच्या पत्नी मेहेरुन्निसा दलवाई, रामचंद्र गुहा, डॉ. हमीद दाभोलकर उपस्थित होते.
माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले अध्यक्षस्थानी होते. पटेल म्हणाल्या, ‘‘अमेरिकेत ट्रम्प यांचा उदय झाला आहे, तर आपल्याकडेही वेगळे लोक सत्तेत नाही. भारतासह जगात मुस्लिमद्वेष वाढत आहे. कट्टर मुस्लिम विचारांचा सखोलपणे अभ्यास करण्याची गरज आहे. देशाची फाळणी व मुस्लिम नेत्यांची भूमिका याची
छाप दलवाईंच्या लिखाणावर दिसून येते.’’ केतकर यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात मुस्लिम समाजाकडे बदलत असलेल्या दृष्टिकोनाविषयी भाष्य केले. अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जर्मनीच्या चॅन्सलर अंजेलिना मर्केल यांनी मुस्लिमांना हाकलून देण्याची भाषा सुरू केली आहे. आपल्या देशातील लोकांनाही ही मांडणी सोयीची आहे. हिंदू-मुस्लिम यांच्यातील तेढ पेटती ठेवणे ही धूर्त राजकीय खेळी आहे.’’ सूत्रसंचालन विनोद शिरसाठ यांनी केले. (प्रतिनिधी)