भगवान महावीरांच्या संदेशावर आधुनिक विज्ञानाची मोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:11 AM2021-04-25T04:11:03+5:302021-04-25T04:11:03+5:30
दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना संक्रमित रुग्णासमोर सरळ रेषेत उभे राहून न बोलता तुम्ही तिरपे ...
दीपक मुनोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना संक्रमित रुग्णासमोर सरळ रेषेत उभे राहून न बोलता तुम्ही तिरपे उभे राहून बोलत असल्यास
संक्रमणाचा धोका ८० टक्क्यांनी कमी होतो. २५०० वर्षांपूर्वी भगवान महावीरांनी सांगितलेल्या या नियमावर आधुनिक विज्ञानानेही नुकतीच मोहोर उमटवली आहे.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. मात्र, अशा प्रकारच्या महामारीचे साथरोग हे दर शे-दीडशे वर्षांनी येत असतात. भगवान महावीरांनी आपल्या दिव्यदृष्टीने अशा महामारीच्या प्रसंगी कोणकोणती काळजी घ्यावयास हवी, याबाबतच्या स्पष्ट अशा सूचना देऊन ठेवल्या होत्या.
याबाबतचा उल्लेख आचार्य उमास्वातीजी यांनी २००० वर्षांपूर्वी संस्कृतमध्ये लिहिलेल्या ‘तत्त्वार्थ सूत्र’ या ग्रंथात मिळते.
सर्वा गतिर्जीवानां पुद् गलानां चाकाशप्रदेशानुश्रेणि भवति, विश्रेणिर्न भवतीति गतिनियम इति।।२।।
याचा अर्थ असा की, जीव आणि पुद् गलांची गती आकाश प्रदेशाच्या सरळ रेषेत असते. तिरपी नसते. हा गतीचा नियम आहे.
कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर, आधुनिक विज्ञानाने विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी विविध प्रयोग सुरू केले. त्यात इतक्या सूक्ष्म कणांच्या हालचाली तपासण्यासाठी जगातील सर्वांत वेगवान आणि सर्वांत अचूक सुपर काॅम्प्युटर फगाकू (FAGAKU) चा उपयोग करण्यात आला. हा प्रयोग करण्यासाठी चार जणांना मास्क न घालता एका टेबलवर बसविण्यात आले. त्यांना फक्त एक मिनीट बोलण्यास सांगितले. फगाकू या सुपर संगणकाद्वारे असे समजले की, मनुष्याच्या तोंडातील लाळेचे सूक्ष्मकण कोणत्या दिशेने सर्वांत जास्त पसरतात. त्या सूक्ष्मजंतुंचे प्रतिबिंब सुपर संगणकावर दिसू लागले. यावरून असे समजले की, ते सूक्ष्मजंतू हे सरळ दिशेने जास्त वेगाने
पसरतात. म्हणजेच समोर बसलेल्या व्यक्तीच्या दिशेने ते कण पसरू लागले. त्यापैकी जवळ बसलेल्या व्यक्तीकडे जाणाऱ्या कणांची संख्या आजूबाजूला बसलेल्या व्यक्तींकडे जाणाऱ्या कणांपेक्षा पाच पटीने जास्त होती. ४५ अंश कोनामध्ये तिरक्या बसलेल्या व्यक्तीकडे जाणाऱ्या कणांची संख्या सर्वांत कमी होती. या प्रयोगाचे निष्कर्ष सायन्स नेचर या जगप्रसिद्ध संस्थेने (fb.com.science nature page/E223) नुकतेच जाहीर केले आहे. यावरून तत्त्वार्थ सूत्राची प्रचिती येते अशी माहिती श्रुतदीप रिसर्च
फाऊंडेशनचे प्रवर्तक आणि जैन धर्माचे गाढे अभ्यासक
वैराग्यरतिविजयजी महाराज यांनी दिली.
चाैकट
२००० वर्षांपूर्वीही महामारीविषयक सूचना
याशिवाय, आचार्य भद्रबाहूस्वामींनी, इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात रचलेल्या ‘ओघनिर्युक्ती’ या प्राकृत भाषेतील ग्रंथातही महामारी रोखण्यासाठी विविध सूचना दिल्या आहेत. त्यात महामारीने त्रस्त व्यक्तीला एकांतवासामध्ये (आयसोलेशन) ठेवणे, महामारीच्या काळात आवश्यक कारणांशिवाय घराबाहेर न जाणे, दोन व्यक्तींमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवणे अशा विविध सूचनांचा समावेश आहे. नेमक्या त्याच स्वरूपाच्या सूचना आता जागतिक आरोग्य संघटना, सरकारी आरोग्य विभाग यांनी दिल्या आहेत अशी माहिती संशोधनप्रिय जैनसंत श्री त्रैलोक्यमंडनविजयजी महाराज यांनी दिली.
—————————