आधुनिक जग शास्त्राने भरलेल्या ज्ञानाची धनदौलत: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 12:58 PM2020-03-07T12:58:54+5:302020-03-07T13:01:46+5:30
आपण नेहमी दुसऱ्याचे माप काढण्यातच वेळ घालवतो
पुणे : माणसासमोर सध्याच्या धावपळीच्या आधुनिक जगात कसे जगावे, हा प्रश्न उभा राहिला आहे. जीवन हे एक गूढ आहे. त्यामध्ये सतत काहीतरी शोधत राहिले पाहिजे. आताचे आधुनिक जग ही शास्त्राने भरलेल्या ज्ञानाची धनदौलत आहे. प्रत्येक व्यक्तीने ज्ञानाचा उत्तम प्रकारे वापर करण्याचा विचार करावा, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.
श्री महर्षी व्यास प्रतिष्ठानच्या वतीने चित्रपटनिर्माते राम डवरी कलागौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पुरंदरे यांच्या हस्ते डॉ. जगन्नाथ दीक्षित, अभिनेत्री उषा नाईक, मधुरा वेलणकर, केजीएम कॉलेज संस्थापक डॉ. कल्याण जाधव यांना राम डवरी कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, नॅशनल शिपिंग बोर्ड अध्यक्ष प्रदीप रावत, नटवर्य डॉ. राम साठ्ये, श्री महर्षी व्यास प्रतिष्ठान अध्यक्ष दिगंबर डवरी आदी उपस्थित होते.
पुरंदरे म्हणाले, ‘‘आपण नेहमी दुसऱ्याचे माप काढण्यातच वेळ घालवतो. जीवनात प्रत्येक गोष्टीचा शोध घेतला पाहिजे. ते करताना माझ्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही, याचेही भान ठेवायला हवे. मनातील ईश्वराला विचारून जगायला शिका. सर्व वाईट विचारांपासून दूर राहा.’’
०००
मी चित्रपटसृष्टीत गेल्या ५० वर्षांपासून कार्यरत आहे. ‘पिंजरा’ या चित्रपटापासून सुरुवात झाली. त्यांनतर मी मागे वळून पाहिले नाही. डवरी यांनी एका स्पॉटबॉयपासून कामाला सुरुवात केली. ते दिग्दर्शकापर्यंत पोहोचले. त्यांच्यामुळे मला प्रेरणा मिळाली. मला राम डवरी यांच्या नावाने पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होत आहे. उषा नाईक; अभिनेत्री
०००
देशातील १३० कोटींच्या लोकसंख्येत सात-आठ कोटी लोकांना मधुमेह आहे. मधुमेह कधी बरा होत नाही. तो आटोक्यात ठेवता येतो; पण भारतासारख्या देशात या आजारावरील उपचारांचा खर्च परवडत नाहीत. मधुमेह या आजारामुळे अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. माणसाने दोन वेळेसच जेवण करावे. त्यामुळे आपण शारीरिकदृष्ट्या उत्तम राहतो. मिळतंय म्हणून सतत खात राहणे, हे मानवी आरोग्यसाठी हानिकारक असते.
डॉ. जगन्नाथ दीक्षित