महापालिका इमारतीतील उद्यानाचे आधुनिकीकरण
By admin | Published: October 16, 2015 01:26 AM2015-10-16T01:26:48+5:302015-10-16T01:26:48+5:30
महापालिकेच्या मुख्य इमारतीतील उद्यानाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. पन्नास वर्षांनंतर प्रथमच या उद्यानाच्या रचनेत बदल करण्यात येत असून
पुणे : महापालिकेच्या मुख्य इमारतीतील उद्यानाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. पन्नास वर्षांनंतर प्रथमच या उद्यानाच्या रचनेत बदल करण्यात येत असून, महापालिकेच्या येत्या वर्धापनदिनी म्हणजे १५ फेब्रुवारीला त्याचे उद््घाटन होईल.
उपमहापौर आबा बागुल यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या आवारातच हे उद्यान आहे. त्यात महात्मा ज्योतीराव फुले यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या इमारतीचे उद््घाटन २७ नोव्हेंबर १९५८ रोजी झाले. त्यानंतर या उद्यानाच्या रचनेत काहीच बदल केला गेला नव्हता. आता संपूर्ण उद्यानाचे त्यातील एकाही वृक्षाचे नुकसान न करता सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
यात मुख्य रस्त्याला जोडूनच भव्य अशी दोन प्रवेशद्वारे असतील. त्यावर दुरूनही दिसणारी पुणे महापालिका अशी आकर्षक अक्षरे आहेत. उद्यानाची आतील रचनाही पूर्णपणे बदलण्यात आली आहे. यात मध्यभागी असलेल्या महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा चबुतराही उंच व आकर्षक करण्यात येणार आहे. पुष्पहार अर्पण करण्यासाठी आता हैड्रॉलिक शिडीचा वापर होईल.
उद्यानाच्या दर्शनी बाजूला महापालिकेचे पहिले महापौर बाबूराव सणस तसेच पहिले आयुक्त स. गो. बर्वे यांचे अर्धपुतळे असणार आहेत. उद्यानाच्या मध्यभागात पदपथ असतील. मध्यभागी नागरिकांसाठी बसण्याची खास व्यवस्थाही आहे. या कामाची निविदा अंतिम मंजुरीच्या टप्प्यात असून, त्यानंतर लगेचच काम सुरू होणार आहे.(प्रतिनिधी)