मोदी, गडकरी किंवा राजनाथसिंहानी फोडावी कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:11 AM2021-02-07T04:11:32+5:302021-02-07T04:11:32+5:30
शरद पवारांचा सल्ला : ‘मला यातलं कळत नसल्याचा’ केला उपहास लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री ...
शरद पवारांचा सल्ला : ‘मला यातलं कळत नसल्याचा’ केला उपहास
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह किंवा नितीन गडकरी यांच्यासारख्या उच्चपदस्थ व्यक्तींनी शेतकरी आंदोलकांशी चर्चा करावी,” असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला. यात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांचा अनादर करण्याचा हेतू नसल्याचे ते म्हणाले.
“तुम्ही पंतप्रधानांशी बोलणार का, या प्रकरणात मध्यस्थी करणार का,” या प्रश्नावर पवारांनी, “मला यातले काही कळत नाही. मला मध्यस्थीसाठी कोणी विचारलेही नाही,” असे उत्तर दिले. पुण्यात ते शनिवारी (दि.६) पत्रकारांशी बोलत होते.
दिल्लीजवळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांनी सरकारला २ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे, यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “सरकारने शेतकरी आंदोलनात पुढाकार घ्यायची गरज आहे. त्यामुळे आंदोलनातून मार्ग निघू शकेल. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींनीही चर्चेसाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे.”
“आंदोलक दिल्लीत येऊ नयेत म्हणून खिळे ठोकणे किंवा रस्ता बंद करणे असे प्रकार देशात यापूर्वी कधीच घडले नाहीत. यात सरकारने अतिटोकाची भूमिका घेतली. यातूनच सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. पण जेव्हा अन्नदाता रस्त्यावर अशा पद्धतीने येतो तेव्हा त्यांच्याप्रती सामंजस्य दाखविण्याची आवश्यकता आहे,” अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी मागे अमेरिकेत असताना ‘मोदी-ट्रम्प’ अशी घोषणा केली. त्याचे स्वागत काही घटकांनी केले होते. आता तशाच प्रकारची प्रतिक्रिया आज परदेशात पाहायला मिळते आहे, याकडेही पवारांनी लक्ष वेधले.
चौकट
पटोलेंवरून टोला
“विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेसचे आहे. फक्त या पद्धतीने पद भरले जाते तेव्हा सहयोगी पक्षांशी विचारविनिमय करण्याची पद्धत आहे,” असा टोला शरद पवारांनी नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून कॉंग्रेसला लगावला.
चौकट
ज्योतिरादित्यांचे ते पत्र
खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी राज्यसभेत पवारांच्या पत्राचा उल्लेख केला. त्याबद्दल पवार म्हणाले, “मी पत्र लिहिले ही खरी गोष्ट आहे. कृषी हा शेवटी राज्याचा विषय आहे. दिल्लीत बिल करण्यापेक्षा राज्यातच याचा विचार करावा. माझा एवढाच हेतू होता की, जर अशा प्रकारचा कायदा करायचा तर राज्याने पुढाकार घ्यायला हवा. या ठिकाणी काय झाले लोकसभेत बिले आणले आणि गोंधळात मंजूर करून घेतली.
चौकट
सचिनला काळजी घेण्याचा उपदेश
“आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्राबद्दल बोलताना काळजी घ्यावी,” असे शरद पवार यांनी ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरला सांगितले. परदेशातील सेलिब्रिटींनी दिल्लीजवळच्या शेतकरी आंदोलनावर केलेल्या ट्वीटनंतर सचिननेही ट्वीटरवरून मत मांडले. यावरून समाज माध्यमांत उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. त्या संदर्भात पवारांनी सचिनला उपदेश केला.