मोदी सरकारने ‘अच्छे दिन’चे गाजर लोकांना दाखविले - शांता रानडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 03:48 AM2017-12-04T03:48:50+5:302017-12-04T03:49:20+5:30
मोदी सरकारने लोकांना अच्छे दिनचे गाजर दाखवले आहे. सरकारचे हिंदुत्ववादाच्या नावाखाली अनेक उद्योग सुरू आहेत. त्या विरोधात विविध संघटनांनी आवाज उठविला आहे.
पुणे : मोदी सरकारने लोकांना अच्छे दिनचे गाजर दाखवले आहे. सरकारचे हिंदुत्ववादाच्या नावाखाली अनेक उद्योग सुरू आहेत. त्या विरोधात विविध संघटनांनी आवाज उठविला आहे. परंतु एखादी चळवळ लोकांमध्ये जाते तेव्हा परिवर्तन नक्कीच होते. याचा अनुभव आम्ही घेतला आहे, असे मत ज्येष्ठ साम्यवादी कार्यकर्त्या शांता रानडे यांनी येथे व्यक्त केले.
स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्या संदर्भातील कायदे, सध्याची व्यवस्था, न्यायव्यवस्था आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी व याबाबत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी देशातील विविध संघटनाच्या वतीने पुण्यात दोन दिवसांचे अखिल भारतीय समाजवादी महिला संमेलन आयोजित केले होते. संमेलनाचा समारोप रानडे यांच्या हस्ते झाला.
सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय सुनीती सु. र., जनमुक्ती संघर्ष वाहिनीच्या रजिया पटेल, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या मनीषा गुप्ते, लोकायतच्या अलका जोशी उपस्थित होते. रानडे म्हणाल्या, आम्ही देशाची स्वातंत्र्य चळवळ, मुबंईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो की गोवा मुक्ती संग्राम सारखे अनेक अच्छे दिन पाहिले आहेत. १९४७ च्या फाळणीदरम्यान संघ परिवाराच्या वतीने हिंदुत्ववादाचा अजेंडा पुढे आणण्याचा मोठा प्रयत्न झाला. परंतु महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर या संघटनेवर काही काळ निर्बंध आल्याने त्यांच्या कारवाया थांबल्या. परंतु, चार-पाच वर्षांपासून देशात सर्वत्र हिंदुत्ववादाची लाट आली आहे. या विरोधात सर्वसामान्य जनता आता एकत्र येत असून, लवकरच परिवर्तन होईल, अशी अशा रानडे यांनी व्यक्त केली.