मोदी सरकारचा संघराज्य व्यवस्था मोडीत काढण्याचा डाव : पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:11 AM2021-04-24T04:11:58+5:302021-04-24T15:15:30+5:30

भाजप सरकारला संविधान, संघराज्य व्यवस्था, कायद्याचे राज्य, धर्मनिरपेक्षता ही तत्त्वे मान्य नाहीत.

Modi government's move to break the federal system: Prithviraj Chavan | मोदी सरकारचा संघराज्य व्यवस्था मोडीत काढण्याचा डाव : पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

मोदी सरकारचा संघराज्य व्यवस्था मोडीत काढण्याचा डाव : पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

Next

पुणे : भाजप सरकारला संविधान, संघराज्य व्यवस्था, कायद्याचे राज्य, धर्मनिरपेक्षता ही तत्त्वे मान्य नाहीत. त्यांचे बेगडी राष्ट्रप्रेम विषमता आणि द्वेष यावर आधारलेले असल्याने स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये कारभार आणि वर्तणुकीत दिसत नाहीत. संसद, न्यायपालिका, कार्यपालिका यांनी एकमेकांच्या अधिकारावर अंकुश ठेवणे अपेक्षित आहे. मात्र मोदी सरकारने संघराज्य व्यवस्था मोडीत काढण्याचा डाव आखला असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

सध्या कोरोनाचे संकट अधिकच बिकट झाले आहे. मात्र वैद्यकीय सुविधांवरील खर्च वाढवण्याऐवजी वीस हजार कोटींचे संसद भवन, बुलेट ट्रेन, पुतळे यावर पैसे खर्च करण्यात सरकार व्यस्त आहे, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याचेही ते म्हणाले.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित आॅनलाइन वसंत व्याख्यानमालेत 'केंद्र-राज्य संबंध' या विषयावर ते बोलत होते.

यूपीए सरकारच्या काळात केंद्र आणि राज्य संबंध चांगले होते. केंद्रातील विरोधी पक्षांचे राज्यांमध्ये सरकार असले तरी संवादाची प्रक्रिया सुरू होती. मित्र आणि विरोधी पक्षांसोबत सतत चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन धोरणे आखली जात होती. परंतु, या कार्यशैलीचा सध्या अभाव दिसत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

'दिल्लीत उपराज्यपालांना सर्व अधिकार देऊन घटनेची पायमल्ली करून जनतेने निवडून दिलेल्या आप सरकारची कोंडी करणे सुरू आहे. उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, कर्नाटक आणि मध्यप्रदेश येथे लोकांनी निवडून दिलेले सरकार केंद्रातील पाशवी बहुमताच्या जोरावर बरखास्त करून इतर पक्षांना सत्तेत येऊ न देण्याचे घातक प्रकार करण्यात आले. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून इतर सरकारांना आणि जनतेला त्रास देण्याचे उद्योग सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

--------

मला भाषण करू दिले नाही....

मे २०१९ मध्ये सत्तांतर झाले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तेव्हा मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काही महिने काम करीत होतो. मोदी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. राजशिष्टाचारामुळे मी मोदींच्या दौऱ्यात सहभागी झालो. सुरुवातीला प्रास्ताविक झाल्यानंतर माझे भाषण सुरू झाले. तेव्हा प्रेक्षकातून ‘मोदी मोदी’ घोषणा सुरू झाल्या आणि मला भाषण करू दिले नाही.... महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजे एका अर्थाने महाराष्ट्राचा हा अपमान होता. मी माझे भाषण थांबवले. त्यानंतर मोदींच्या एकाही महाराष्ट्र दौऱ्यात मी सहभागी झालो नाही.... साधा राजशिष्टाचार देखील मोदींच्या दौऱ्यात पाळला गेला नाही....असा कटू अनुभव पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला.

---------------------------------------------------------

Web Title: Modi government's move to break the federal system: Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.