"मोदी-शाह होश में आओ, होश में आओ.."; पुण्यात शेतकरी संघटना आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 03:15 PM2021-02-06T15:15:28+5:302021-02-06T15:19:38+5:30
आंदोलक आक्रमक होत वाहनांच्या समोर झोपल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण
पुणे : मोदी-शाह होश में आओ.. होश में आओ, कामगार आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, वापस लो..वापस लो काला कानून वापस लो, केंद्र सरकार हाय हाय, रद्द करा रद्द करा काळे कृषी कायदे रद्द करा,यासारख्या घोषणांद्वारे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ व केंद्र सरकारच्या निषेधार्थ बाणेर व वारजे येथे शेतकरी संघटनांसह विविध राजकीय पक्षांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, आंदोलनामुळे मुंबई- बेंगलोर महामार्गावर काहीवेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.
पुण्यात शनिवारी वारजे आणि बाणेर याठिकाणी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ चक्का जाम आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यामुळे बाणेर परिसरामध्ये काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी शेतकरी आंदोलकांनी बालेवाडी फाटा परिसरामध्ये या आंदोलन करत रस्ता रोखून धरला होता. शेतकरी आंदोलनात त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक आक्रमक होत वाहनांच्या समोर झोपल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांची फोन ची वाट न बघता हे काळे तीन कायदे मागे घ्यावेत. गेले अडीच महिने शेतकरी आंदोलन करीत आहेत देशातील शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचा घाट केंद्र सरकार रचत आहे. देशातील शेतकऱ्यांच्या एक जुटी पुढे मोदी सरकारला हे तीन शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावे लागतील.
शेतकरी आंदोलच्या समर्थनार्थ वारजेतही चक्का जाम
वारजे : शेतकरी संघटनांच्या दिल्लीतून आलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत वारजे उड्डाणपूल चौकात सर्वपक्षीय चक्का जाम आंदोलन करण्यात आले. वापस लो वापस लो, काला कानून वापस लो, म्हणत सकाळी अकराच्या सुमारास मोठ्या संख्येने आंदोलकांनी घोषणा देत काही काळ मुंबई-बंगळुरू महामार्ग सेवा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी योग्य नियोजन केल्याने वाहतुकीस फारसा अडथळा झाला नाही. केंद्राच्या निषेधार्थ भाषणे झाल्यावर सुमारे दीड तास चाललेले आंदोलन सहायक पोलिस आयुक्तांनी अखेर हस्तक्षेप करत आटोपते घ्यायला लावले. यावेळी दत्ता पाखिरे,जावेद शेख, सचिन बराटे, दत्ता झंजे, पैगंबर शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेत प्रतिबंधक कारवाईसाठी वारजे पोलीस ठाण्यात नेण्यात आले.