माेदीनींच आम्हाला दहशतवादाची व्याख्या सांगावी : डाॅ. बाबा आढाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 08:17 PM2019-04-02T20:17:36+5:302019-04-02T20:20:02+5:30
पंतप्रधानांनी त्यांची दहशतवादाची व्याख्या सांगावी असे आवाहन ज्येष्ठ समाजवादी नेते डाॅ. बाबा आढाव यांनी केले.
पुणे : मुळशी तालुक्यातील जांभे येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या दलित कामागाराला मालकाने कामावरुन झालेल्या बाचाबाचीत विष्ठा खाण्यास भाग पाडले हाेते. हा एक प्रकारचा हिंदू दहशतवादच आहे, परंतु वर्ध्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले हिंदू दहशतवाद हा शब्द खटकताे. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांची दहशतवादाची व्याख्या सांगावी असे आवाहन ज्येष्ठ समाजवादी नेते डाॅ. बाबा आढाव यांनी केले.
मुळशी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली हाेती. मालक आणि कामागारामध्ये कामावरुन झालेल्या बाचाबाचीत मालकाने कामगाराला विष्ठा किंवा आईशी संभाेग कर असे म्हणत मारहाण केली. घाबरुन कामगाराने विष्ठा खालली हाेती. या प्रकरणामुळे कामगार कुटुंबीय घाबरुन गेले हाेते. त्यांनी दुसऱ्या दिवशी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याप्रकरणी वीटभट्टी मालक संदीप पवार (रा. वाघजाई मंदिराचे पाठीमागे, जांबे, ता. मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. न्यायालयाकडून आराेपीला जामीन मिळाला. याप्रकरणाचा तपास याेग्य न केल्यामुळे आराेपीला जामीन मिळाला असा आराेप आढाव यांनी केला. तसेच त्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
आढाव म्हणाले, वीठ भट्टीवर कामासाठी आलेलं दलित कुटुंब हे पाेट भरण्यासाठी आलं हाेतं. त्याला मालकाकडून विष्ठा खाण्यास सांगण्यासारखं भीषण प्रकरण घडलेलं असताना पंतप्रधान वर्ध्याच्या सभेत म्हणतात हिंदू दहशतवाद हा शब्द खटकताे. ताे काॅंग्रेसने आणला आहे. कामागाराला विष्ठा खाण्यास सांगने हा दहशतवाद नाही का. गांधींना मारलं ताे हिंदू दहशतवाद नव्हता का त्यामुळे माेदींनी दहशतवादाची व्याख्या स्पष्ट करावी. माेदी पुण्यात प्रचाराला आले तर आम्ही त्यांना हे प्रश्न विचारु. दाभाेळकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांचे खुनी सापडत नाहीत. न्यायालय वेळाेवेळी सरकारचे कान टाेचत असते. तरी सुद्धा सरकार गंभीर दिसत नाही.