मोदी लाटेवर शिरोळे विजयी
By Admin | Published: May 17, 2014 05:38 AM2014-05-17T05:38:50+5:302014-05-17T05:38:50+5:30
देशभरातील नरेंद्र मोदी यांच्या लाटेला पुण्यात सुनामी मानले जात आहे. पुणे लोकसभेच्या सहा विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी मताधिक्य घेतले.
पुणे : देशभरातील नरेंद्र मोदी यांच्या लाटेला पुण्यात सुनामी मानले जात आहे. पुणे लोकसभेच्या सहा विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी मताधिक्य घेतले. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ३ लाखाहून अधिक मतांच्या फरकाने ते विजयी झाले. त्याचवेळी काँग्रेसला हक्काचे सुमारे २ लाख ५० हजार मताधिक्य राखता आलेले नाही. तर राज ठाकरे यांचा करिष्मा न चालल्याने मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांना एक लाख मतांच्या आत समाधान मानावे लागले. आम आदमी पक्षाचे सुभाष वारे यांनाही ३० हजाराचा टप्पा ओलांडता आला नाही. पुणे लोकसभेचे विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहाराचे आरोप होते. त्यामुळे काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारले. पुण्यात नवीन चेहरा आणि कोरी पाटी म्हणून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली. युवा ब्रिगेडचे सदस्य असल्याने राहुल गांधी यांनी कदम यांच्यासाठी सभा घेतली. कदम यांनी प्रचारातही आघाडी घेतली होती. तरीही मोदी लाटेमुळे काँग्रेसला स्वत:चा बालेकिल्ला असलेले वडगावशेरी, शिवाजीनगर व कॅन्टोन्मेंट याठिकाणीही मताधिक्य घेता आले नाही. त्यामुळे कदम यांना दोन लाखांच्या आतमध्ये समाधान मानावे लागले. भाजपच्या जागेसाठी शहराध्यक्ष शिरोळे आणि ज्येष्ठ आमदार गिरीश बापट स्पर्धेत होते. परंतु, गोपीनाथ मुंडे समर्थक शिरोळे यांनी उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली. त्यामुळे बापट यांना मानणारा गट नाराज होता. तसेच, ऐनवेळी प्रचारप्रमुख पदाची धुरा माजी खासदार प्रदीप रावत यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळे मिसाळ याही काही काळ नाराज होत्या. मात्र, मुंडे यांच्या सभेनंतर त्याही सक्रिय झाल्या. मुंडे यांनी कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर व वडगावशेरी या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात तीन सभा घेतल्या. त्यानंतर खासदार रामदास आठवले यांचा रोड शो, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यात येवून प्रचारात भाग घेतला. तर, नरेद्र मोदी यांच्या पुण्यातील एस.पी. कॉलेजच्या मैदानावरील सभेला पुणेकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मनसेला पुण्यातून पहिला खासदार देण्यासाठी राज ठाकरे यांनी दीपक पायगुडे यांच्यासाठी तब्बल चार सभा घेतला. परंतु, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मात्र, मोदी फॅक्टमुळे शिरोळेंना अभूतपूर्व यश मिळाले.