वीजमीटरमध्ये फेरफार; रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:07 AM2018-10-06T00:07:00+5:302018-10-06T00:07:19+5:30
महावितरणची कारवाई : इंदापूरमध्ये ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बारामती : इंदापूर शहरात वीजवापरदाराच्या संगनमताने मीटरमध्ये फेरफार करून देणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील दोन जणांना साहित्यासह महावितरणच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या तिघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी, की इंदापूर शहरातील जुने स्टेट बँक रस्ता परिसरात मंगळवारी (दि. २) सायंकाळी एका घरगुती वीजमीटरमध्ये फेरफार करण्यासाठी दोघेजण येत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे सहाय्यक अभियंता महेश पवार व कर्मचारी परिसरात आले.
वीजग्राहकाकडील मीटर उघडून त्यात फेरफार सुरु झाल्यानंतर महावितरणच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. दोनपैकी एकजण घराच्या वरच्या मजल्यावर पळून गेला तर दुसºयाला महावितरणच्या कर्मचाºयांनी पकडून ठेवले व पोलिसांना कळवले. पोलीसांनी तात्काळ येऊन वीजमीटरमध्ये फेरफार करणाºया या दोघांनाही ताब्यात घेतले. तसेच पंचनामा करून वीजमीटरमध्ये फेरफार करण्यासाठी त्यांनी आणलेले साहित्य जप्त करण्यात आले. यानंतर वीजमीटरमध्ये फेरफार करणारे माळशिरस तालुक्यातील (जि. सोलापूर) शब्बीर असगरअली भोरी ( रा. राऊतनगर, अकलूज) व राजेंद्र विठ्ठल लावंड, (रा. रामायण चौक, अकलूज) तसेच इंदापूर येथील प्रमोद (पप्पू) पलंगे या तिघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मोहिमेत एकूण ४५ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली. या सर्वच १११ वीजचोरांविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. पुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे व बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता दत्तात्रय पडळकर, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता डी. के. कोरडे यांच्यासह सुमारे ५० अभियंते व कर्मचाºयांनी पाच पथके तयार करून तीन दिवस वीजचोरीविरोधात मोहीम राबविली.
इंदापूर व बारामतीत ४५ लाखांची वीजचोरी उघड
इंदापूर व बारामती शहर परिसरात ४५ लाखांची वीजचोरी उघड - महावितरणच्या बारामती विभाग अंतर्गत बारामती व इंदापूर तालुक्यात तसेच भिगवण महामार्ग परिसरातील हॉटेल्स, ढाबे तसेच इंदापूर शहरातील अनेक दुकाने, हॉस्पीटल्स अशा १११ ठिकाणी ४५ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे.
महामार्गावरील मोठी हॉटेल, ढाबे तसेच बारामती व इंदापूर शहरातील संशयास्पद वीजवापर आढळून आलेली हॉस्पीटल्स, उद्योग व मोठी दुकाने अशा सुमारे ३०० वीजग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली.
यामध्ये दोन ठिकाणी रिमोट कंट्रोलद्वारे वीजमीटरचा वापर कमी दाखविण्याचा प्रकार उघडकीस आला तर १०९ ठिकाणी मीटरमध्ये फेरफार करणे, वीजचोरीसाठी वेगळे सर्किट बसविणे आदी प्रकार आढळून आले.