मोदींची जुमलेबाजी; बापटांची फेकूगिरी - मोहन जोशी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 02:22 AM2018-12-20T02:22:56+5:302018-12-20T02:23:12+5:30
मोहन जोशी : पुण्यातील कार्यक्रमावर टीका
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारी पुण्यात झालेला कार्यक्रम म्हणजे निवडणुकीची जुमलेबाजी होती. त्याच कार्यक्रमांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी ७० हजार कोटी रुपयांच्या विकासाच्या बाता मारत फेकूगिरीत आपणही कमी नाही, हे पंतप्रधानांना दाखवून दिले, अशी टीका काँग्रेसचे माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केली.
मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित मंगळवारी झालेल्या हिंजवडी मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रम म्हणजे भारतीय जनता पार्टीचा नेहमीचा चुनावी जुमला होता, असे सांगून जोशी म्हणाले, निवडणुकांपुर्वी व नंतरही भरमसाठ घोषणा करायच्या, हजारो कोटी रुपयांच्या गप्पा करायच्या, हीच आता मोदी यांची ओळख झाली आहे. पुण्यातही त्यांनी तेच केले. स्मार्ट सिटीची दीड हजार कोटी रुपयांची कामे कुठे आहेत, कोणाला दिसली आहेत, ते त्यांनी जाहीर करावे. खोटे बोलायचे हे त्यांनी ठरवलेलेच आहे. अशा अनेक थापा ते मारत असतात. त्यांचे म्हणणे खरे असेल तर राज्य सरकारनेच स्मार्ट सिटी कंपनीची दीड हजार कोटी रुपयांची कामे जाहीर करावीत, म्हणजे पुणेकरांना निदान ती कुठे आहेत, ते तरी समजेल, असे जोशी म्हणाले. शहरांची नावे बदलायची ही तर भाजपाची परंपराच आहे. शहरांपुरती ते वापरत होते. मात्र, आता त्यांनी देशाच्या थोर नेत्यांची जन्मभूमीही बदलायचा प्रकार सुरू केला आहे. लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले यांची जन्मभूमीही मोदी यांना माहिती नाही. पुणे ही त्यांची जन्मभूमी असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. याचा काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे असे जोशी म्हणाले.
भाजपाच्या सर्वच नेत्यांमध्ये सत्तेची गुर्मी
मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराज असा उल्लेख न करता फक्त छत्रपती शिवाजी असा उल्लेख केला तो अवमान करणारा आहे, असे जोशी म्हणाले. भाजपाच्या सर्वच नेत्यांमध्ये सत्तेची गुर्मी असून आपण बोलू ते ऐकले जाईल, अशी त्यांची भावना झाली आहे. मोदी यांच्या पुणे दौऱ्यात तेच दिसून आले. काँग्रेसच्या वतीने त्याचा निषेध करत आहे, असे जोशी म्हणाले.