मोदींचा विजय हा सावरकरांच्या विचारांचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 01:07 PM2019-05-27T13:07:07+5:302019-05-27T13:08:33+5:30

‘राष्ट्रहित हीच सावरकरांच्या तत्वांची भूमिका होती.त्यांच्या राष्ट्रहिताच्या नीतीला आज न्याय मिळाला आहे.

Modi's victory is a victory of Savarkar's thoughts | मोदींचा विजय हा सावरकरांच्या विचारांचा विजय

मोदींचा विजय हा सावरकरांच्या विचारांचा विजय

googlenewsNext
ठळक मुद्देअक्षय जोग लिखित पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : सावरकरांच्या राष्ट्रहिताच्या नीतीला आज न्याय मिळाला आहे. त्यांच्या भूमिकेला कोंदण लाभले आहे. बुद्धिप्राण्यावर आधारित विज्ञाननिष्ठा ही सावरकरांची आपल्याला मिळालेली देणगी आहे. त्यांची मूल्ये सत्तेच्या रुपात सत्यात उतरली आहेत. नरेंद्र मोदींचा विजय हा सावरकरांच्या विचारांचा विजय आहे, असे मत माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केले. निवडणुकीतील पराभव कोणत्याही पक्षाचा नसून, राष्ट्रीय ऐक्याला बाधा निर्माण करणा-या राजकारणाचा पराभव आहे, असेही त्यांनी नमूद केले. 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव’ या अक्षय जोग लिखित पुस्तकाचे प्रकाशन रावत यांच्या हस्ते रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि अध्यासन येथे पार पडले. यावेळी लेखक अक्षय जोग, मृत्यूंजय प्रकाशनाचे सात्यकी सावकर उपस्थित होते. याप्रसंगी रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिर उभारणा-या भागोजीसेठ कीर यांचे वंशज विवेक कीर आणि ‘त्या तिघी-स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ या एकपात्री नाट्यप्रयोगाच्या सादरकर्त्या अपर्णा चोथे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
रावत म्हणाले, ‘सावरकरांनी द्विराष्ट्रवादाची वस्तूस्थिती मांडली. त्यांची सामाजिक, धार्मिक मूल्ये, वैचारिक पाया, बुध्दीवादाचा वैज्ञानिक दृष्टिकोन असा अखंड धागा समजून घेणे आवश्यक आहे.  हिंदुत्व हे राजकारणाचे मध्यवर्ती सूत्र बनले आहे. सावरकरांविरोधात गरळ ओकणाऱ्या, नालस्ती करणाऱ्या सुपारी गँगला वैचारिक बैठक नाही. धर्मनिरपेक्षतेच्या, पुरोगामित्वाच्या नावाखाली मुल्यांना काळिमा फासणारे राजकारण केले गेले.’ 
‘राष्ट्रहित हीच सावरकरांच्या तत्वांची भूमिका होती. कोणतेच राष्ट्रहित हिंदूविरोधी असू शकत नाही. समानता हाच हिंदुत्वाचा मूळ धागा आहे. सावरकरांचा विचार खालच्या स्तरापर्यंत तर बाबासाहेबांचा विचार वरच्या स्तरापर्यंत पोहचला पाहिजे. महापुरुषांची साम्यस्थळे, वेगळेपणाची मांडणी यांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. समाजाने एकत्र यायचे असेल तर फुटीरतावादी शक्तींना दूर ठेवता आले पाहिजे’, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Modi's victory is a victory of Savarkar's thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.