मोहन हे कधी ऑस्ट्रेलियात, तर कधी सोलापूरला, या वयातही प्रचंड काम - शर्मिला टागोर
By श्रीकिशन काळे | Published: July 23, 2023 03:56 PM2023-07-23T15:56:10+5:302023-07-23T15:56:18+5:30
अभिनय आणि वैद्यकीय अशा दोन्ही क्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय
पुणे : ‘‘मोहन आगाशे हे अभिनेते, लेखक, डॉक्टर, शिक्षक अशा अनेक भूमिकांमध्ये आपल्याला पहायला मिळतात. अभिनय आणि वैद्यकीय अशा दोन्ही क्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय आहे. ते स्वत: खूप संवेदशनशील आहेत. ते अतिशय नम्र आहेत. कधीही बोलायला तयार असतात. ते कामात प्रचंड गर्क असतात. ते कधी ऑस्ट्रेलियात असतात, तर कधी सोलापूरला आणि कधी गोव्यात. ते ७४-७५ व्या वयातही प्रचंड काम करत आहेत,’’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी काढले.
निमित्त होते, त्रिदल पुणे, पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीने देण्यात येणाऱ्या 35 व्या पुण्यभूषण पुरस्काराचे! ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना आज बालगंधर्व रंगमंदिरात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री पद्मभूषण शर्मिला टागोर आणि पद्मभूषण अनुपम खेर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. सोन्याच्या नांगराने भूमी नांगरणारे बाल शिवाजी यांचे शिल्प असणारे पुण्यभूषण सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शर्मिला टागोर म्हणाल्या, मला पुण्यात येऊन खूप आनंद होत आहे. इट्स लव्हली सिटी. अतिशय सुंदर असे हे शहर आहे. या शहरात खूप ऊर्जा आहे. विविध प्रकारचे लोकं आहेत. मलाही अनेक पुरस्कार विविध ठिकाणांहून मिळाले आहेत. परंतु, आजच्या सारखा पुरस्कार प्रदान सोहळा मनाला अविस्मरणीय आनंद देणारा आहे. एवढा आदरयुक्त हा सन्मान होत आहे. या सोहळ्यासाठी देशासाठी लढणारे जवान देखील उपस्थित आहेत. ज्यांनी आपले आयुष्य देशासाठी दिले. त्यांच्याप्रती मी अतिशय कृतज्ञ आहे. आज माझे खास मित्र मोहन यांना जो सन्मान दिला जात आहे, ते पाहून मी अतिशय आनंदी झाले आहे. माझ्या हस्ते त्यांचा सन्मान हा माझाच गौरव झाला असे वाटत आहे. आज कितीतरी मान्यवर या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित आहेत, त्यावरून मोहन यांचे काम किती मोठे आहे ते समजते. माझी आणि मोहन यांची ४० वर्षांची ओळख आहे. आमच्या व्यस्त जीवनातून आम्ही कॉफीसाठी कधी कधी भेटतो. मी तरूणपणी अभिनयात प्रवेश केला आणि मोहन यांनी देखील कमी वयात या क्षेत्रात पर्दापण केले.
सुमित्रा भावेंशी त्यांचे आदराचे नाते !
टागाेर म्हणाल्या,‘‘ आगाशे यांचे सुमित्रा भावे यांच्याशी एक वेगळे मैत्रीचे, आदराचे नाते होते. त्यांच्याशी असलेले नातं जपण्यासाठी ते स्वत:चे पैसे खर्च करून सुमित्रा भावे यांनी लिहिलेल्या स्क्रिप्टवर ‘आऊटहाऊस’ हा चित्रपट करत आहेत. त्यामध्ये मी सुध्दा काम करत आहे. आज या कार्यक्रमात आल्यावर चंदू बोर्डे यांना पाहून खूप आनंद झाला. कारण त्यांना भेटून आता खूप वर्षे झाली. त्यांचा काल वाढदिवस होता, त्यांना वाढदिवसांच्या खूप खूप शुभेच्छा.