बिरजूमहाराजांची रसिकांवर मोहिनी
By admin | Published: January 5, 2016 02:34 AM2016-01-05T02:34:55+5:302016-01-05T02:34:55+5:30
ज्येष्ठ नर्तक पं. बिरजूमहाराज यांच्या गायन आणि ठुमरीवरील ‘भाव’ सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते ‘कलाछाया’ आयोजित स्वर्णपर्व
पुणे : ज्येष्ठ नर्तक पं. बिरजूमहाराज यांच्या गायन आणि ठुमरीवरील ‘भाव’ सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते ‘कलाछाया’ आयोजित स्वर्णपर्व सांगता समारोहाचे. नृत्य, गायनाने या महोत्सवाचा समारोप झाला.
सुरुवातीस कलाछाया संस्थेतील विद्यार्थिनींनी पं. भीमसेन जोशी यांनी गायलेले ‘चतर्भुज झुलत शाम हिंदोळे’ हे भजन सादर केले. पं. रविशंकर यांच्या धमार तालातील बंदिशीवर ‘होळी’ ही नृत्यरचना सादर केली. त्यानंतर रश्मी जंगम यांनी सुरेश भट यांच्या ‘मी मज हरवून बसले ग’ या गाण्यावर एक वेगळाच नृत्यसाज चढविला.
शिष्यवर्गाच्या सादरीकरणानंतर कथक गुरू शाश्वती सेन यांनी तीन तालात जुन्या बंदिशी सादर केल्या. सुरुवातीस ‘जय जय राधे कृष्ण हरे’ या गीतावर नृत्यरचना सादर
केली.
त्यानंतर गुरू पं. बिरजूमहाराज यांच्या तबलासाथीने ताल धमारमध्ये मुक्तछंद, अवघड परन, तुकडे, तिहाई आदी प्रकार सादर केले. सेन यांनी ‘इंतजार’ या रचनेवर भावविभोर करणारे नृत्य सादर केले. त्यांना अरविंदकुमार आझाद, सोमनाथ मिश्रा, सुनील अवचट यांनी साथसंगत केली. (प्रतिनिधी)