वढू खुर्दच्या सरपंचपदी मोहिनी सचिन भोंडवे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:11 AM2021-02-13T04:11:16+5:302021-02-13T04:11:16+5:30
लोणी कंद : वढू खुर्द (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोहिनी सचिन भोंडवे तर उपसरपंचपदी सीमा नंदकिशोर भंडलकर याची ...
लोणी कंद : वढू खुर्द (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोहिनी सचिन भोंडवे तर उपसरपंचपदी सीमा नंदकिशोर भंडलकर याची बिनविरोध निवड झाली आहे. येथील सरपंचपद सर्वसाधारण प्रवगार्साठी खुले असतानाही येथील सत्तासूत्रे महिलांच्या हाती देत गावामध्ये ३५ वर्षांनंतर भोंडवे यांना सरपंचपद मिळाल्याने गावामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
वढू खुर्दच्या निवडणुकीत श्री भैरवनाथ ग्रामविकास आघाडी पॅनेलने भैरवनाथ महाविकास पॅनेलचा धुव्वा उडवीत सर्वच्या सर्व नऊ जागा जिंकल्या. श्री भैरवनाथ ग्रामविकास आघाडी पॅनेलचे नेतृत्व माजी सैनिक जालिंदर भोंडवे, माजी सरपंच ज्ञानेश्वर चौंधे, बाप्पुसाहेब भोंडवे यांनी केले होते. या निवडणुकीत मोहिनी भोंडवे, सीमा भंडलकर, रसिका चौंधे, वंदना दरेकर, कोमल धुळे, महेंद्र खांदवे, नवनाथ पवळे, रामदास भंडलकर, शंकर काकडे हे निवडून आले होते. सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी राखीव असल्याने सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे महिलांना देत गावची सूत्रे महिलांच्या हाती देण्याचे गावात एकमत झाले.
सरपंचपदासाठी मोहिनी सचिन भोंडवे व उपसरपंच पदासाठी सीमा नंदकिशोर भंडलकर यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदी मोहिनी सचिन भोंडवे व उपसरपंचपदी सीमा भंडलकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी. आर. गवंडी यांनी जाहीर केले. त्यांना ग्रामविकास अधिकारी नंदकुमार चव्हाण यांनी साहाय्य केले. यावेळी सरपंचपदी मोहिनी भोंडवे विराजमान झाल्यानंतर त्यांनी गावामध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्याबरोबरच वाड्यावस्त्यांवर ड्रेनेजसह रस्त्यांची कामे करण्यावर भर देत पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणार असल्याचे सांगितले.
चौकट : ३५ वर्षांनंतर मिळाले सरपंचपद वढू खुर्दच्या गावच्या विकासामध्ये भोंडवे व चौंधे परिवाराचा मोठा वाटा आहे. ३५ वर्षापूर्वी बाप्पुसाहेब भोंडवे हे सरपंच होते. त्यानंतर आज ३५ वर्षानंतर मोहिनी भोंडवे यांच्या रुपाने भोंडवे परिवाराला पुन्हा गावची सेवा करण्याची संधी मिळाल्याने गावामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
फोटो : वढू खुर्द (ता. हवेली) येथील ग्रामपंचयातीच्या सरपंचपदी मोहिनी सचिन भोंडवे व उपसरपंच सीमा नंदकिशोर भंडलकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सन्मान करताना मान्यवर.