स्थायी समिती अध्यक्षपदी मोहोळ
By admin | Published: March 30, 2017 03:06 AM2017-03-30T03:06:40+5:302017-03-30T03:06:40+5:30
स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड झाली
पुणे : स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार रेखा टिंगरे यांनी माघार घेतल्यामुळे मोहोळ यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची निवड जाहीर करण्यात आली.
अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी पीठासीन अधिकारी म्हणून सकाळी साडेअकरा वाजता महापालिकेच्या छत्रपती
शिवाजी महाराज सभागृहात निवडणुकीचे कामकाज सुरू केले. महापौर मुक्ता टिळक, आयुक्त कुणाल कुमार, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे संजय भोसले यावेळी उपस्थित होते. भाजपा तसेच आघाडीच्या अनेक नगरसेवकांनीही निवडणुकीसाठी सभागृहात हजेरी लावली होती. नगरसचिव सुनील पारखी यांनी पाटील यांना साह्य केले.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने रेखा टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पाटील मोहोळ व त्यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी करून अर्ज माघारीसाठी म्हणून १५ मिनिटे वेळ दिला.
अखेरच्या पाच मिनिटांत टिंगरे यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर लगेचच पाटील यांनी मोहोळ यांची निवड झाली असल्याचे जाहीर केले. स्थायी समितीत भाजपाचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ व काँग्रेस-शिवसेनेचे प्रत्येकी १ याप्रमाणे १६ सदस्य आहेत.
बहुमतामुळे मोहोळ यांची निवड अपेक्षितच होती. मात्र महापौर व उपमहापौर अशा दोन्ही पदांची निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने लढविल्यामुळे ते ही निवडणूकसुद्धा लढवतील अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी त्यांनी टिंगरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोहोळ यांचा मार्ग मोकळा झाला.
कार्यकर्त्यांसमवेत गर्दीने स्थायी समिती अध्यक्ष कार्यालयात जाऊन मोहोळ यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांच्या निवडीचा आनंद व्यक्त केला.
स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले मोहोळ प्रभाग क्रमांक १२ मधून विजयी झाले आहेत. याआधी ते दोन वेळा नगरसेवक होते. यापुर्वीच्या सभागृहात त्यांच्या पत्नी मोनिका मोहोळ नगरसेवक होत्या. कला शाखेचे पदवीधर असलेले मोहोळ सुरुवातीपासून भाजपाचेच कार्यकर्ते आहेत.
पक्षाच्या विविध आघाड्यांमध्ये त्यांनी पदाधिकारी म्हणून काम केले आहे. भाजपाचे शहर संघटन सरचिटणीस म्हणून ते सध्या कार्यरत होते. महापालिका कामकाजाच्या अनुभवामुळे पक्षाने या पदासाठी त्यांची निवड केली. (प्रतिनिधी)