जनसंवाद मधील मोहोळ, धंगेकरांच्या खुर्च्या रिकाम्याच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 08:39 PM2024-04-20T20:39:18+5:302024-04-20T20:39:54+5:30
गैरहजेरीवर टीका : वसंत मोरे, कर्नल सुरेश पाटील उपस्थित
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: परिवर्तन संस्थेने आयोजित केलेल्या जनसंवाद या कार्यक्रमाला भाजपचे मुरलीधर मोहोळ व काँग्रेसचे रविंद्र धंगेकर अनुपस्थित राहिले. संयोजकांनी त्यांच्या खुर्च्या रिकाम्याच ठेवत वसंत मोरे व कर्नल सुरेश पाटील या दुसर्या दोन ऊमेदवारांबरोबर संवाद साधला.
मोहोळ धंगेकर यांना १५ दिवस आधी संपर्क साधून होकार घेतला. तरीही ते आले नाहीत. आताच असे उत्तरदायित्व दाखवणारे उमेदवार निवडून आलेच तर काय करतील असा प्रश्न करत परिवर्तनचे संयोजक तन्मय कानिटकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या खुर्च्या रिकाम्याच राहतील असे त्यांनी जाहीर केले व मोहोळ यांचे प्रतिनीधी म्हणून आलेले गणेश बिडकर यांना व्यासपीठावर बोलावण्यास नकार दिला.
परिवर्तनच्या अध्यक्ष अम्रुता नागटिळक, इंद्रनील सदलगे व कानिटकर यांनी मोरे व कर्नल पाटील यांना बोलते केले.
आबासाहेब गरवारे कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. संस्थेने नागरिकांकडून प्रश्न मागवले होते. सार्वजनिक वाहतूक, बेरोजगारी, मेट्रोचा फायदा तोटा, लोकसंख्या, स्थलांतरीत, समान नागरी कायदा अशा अनेक विषयांवरचे प्रश्न होते.
मोरे व कर्नल.पाटील यांनी त्यांना उत्तरे दिली. सर्वाधिक प्रश्न सार्वजनिक वाहतूकीशी संबधित होते. नियोजनाचा अभाव व आहे ती व्यवस्था कार्यक्षम करण्यात अपयश असे यावर मोरे व पाटील यांनी सांगितले. खासदार झालो तर नियोजन करू व यात नक्की बदल करू, त्यासाठी काही उपाय आहेत, काही नियम आहेत, त्याचा अवलंब करण्यास भाग पाडू असे त्यांनी सांगितले.