‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात मोहोळचा आमदार; या क्रमांकापासून सावध राहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 11:46 AM2023-02-11T11:46:47+5:302023-02-11T11:47:20+5:30

खंडणी उकळण्याचा प्रयत्न...

Mohol MLA yashvant mane in 'sextortion' trap; One was taken into custody from Rajasthan | ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात मोहोळचा आमदार; या क्रमांकापासून सावध राहा!

‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात मोहोळचा आमदार; या क्रमांकापासून सावध राहा!

googlenewsNext

पुणे : समाजमाध्यमावर चित्रफीत तसेच छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्याकडून खंडणी उकळण्याचा (सेक्सटाॅर्शन) प्रकार घडला. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत एका आरोपीला राजस्थानमधील एका गावातून अटक केली.

रिझवान अस्लम खान (२४, रा.सिहावली महारायपूर, जि. भरतपूर, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणामुळे अनेक घटनांचा छडा लागला आहे. आरोपीने ८० लोकांना कॉल केल्याचे आणि स्क्रीन रेकॉर्ड केलेले ९० अश्लील व्हिडीओ मिळाले. दि. ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान हा प्रकार घडला. आरोपीकडून चार मोबाइल संच, ४ सिम कार्ड जप्त करण्यात आली आहेत.

राजस्थानातील सिहावली महारायपूर गावात अनेकजण सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा उद्योग करतात. त्यांना दूरध्वनी क्रमांक कसे उपलब्ध झाले, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला स्वत: आमदार यशवंत माने, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे पाटील उपस्थित होते.

आमदार माने मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानसभेवर निवडून आले आहेत. ते पुण्यात वास्तव्याला आहेत. त्यांच्या समाजमाध्यमातील खात्यावरून गुरुवारी (दि. २) अनोळखी व्यक्तीने त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्यानंतर, एकापाठोपाठ त्या मोबाइलवरून त्यांना व्हिडीओ कॉल्स आले. अश्लील ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन एक लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. अशा पद्धतीने आरोपीने अनेकांना धमकावले असल्याचे लक्षात आल्यावर आमदार माने यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर, सायबर गुन्हे शाखेच्या तातडीने तपास सुरू केला.

दूरध्वनी राजस्थानमधील भरतपूर परिसरातून येत असल्याचे तांत्रिक विश्लेषणात निदर्शनास आले. त्यानंतर, सहायक पोलिस निरीक्षक बलभीम ननावरे आणि पथक तेथे रवाना झाले. गेल्या महिन्यात राजस्थानातील भरतपूर परिसरातील एका गावात पुणे पोलिसांनी कारवाई करून, सेक्सटाॅर्शनचा प्रकार उघडकीस आणला होता. पुणे पोलिसांचे पथक आठवडाभर राजस्थानात तळ ठोकून होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने या पथकाने गुरुवारी आरोपी रिझवान याला अटक केली. आरोपी रिझवानने देशभरातील अनेकांना खंडणीसाठी धमकावले आहे. त्याला सिम कार्ड तसेच बँक खाते उपलब्ध करून देणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.

या क्रमांकापासून सावध राहा!

कुणीही ७७४२६७०३५८, ८८६५०२४८६२, ८००१९७०१७८ किंवा ९५८७३४२८२८ या मोबाइल क्रमांकावर अश्लील व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देऊन पैसे मागितले असल्यास किंवा मागत असल्यास तत्काळ सायबर पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मला २३ जानेवारीला मेसेज आला; पण मी प्रतिसाद दिला नाही. ३१ जानेवारीला सव्वानऊ वाजता व्हिडीओ कॉल आला. मी उचलला की, ते म्युट करायचे. साडेदहा वाजता व्हिडीओ कॉल उचलल्यानंतर अश्लील काहीतरी दाखविण्यात आले. मग मला एकाने स्क्रीन शॉट पाठविला. एक लाख रुपये दे, अन्यथा हे फेसबुकला टाकेन, अशी धमकी दिली. मी तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधला.

- यशवंत माने, आमदार

Web Title: Mohol MLA yashvant mane in 'sextortion' trap; One was taken into custody from Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.