मोहोळकर, भोसले गटाने गड राखले
By admin | Published: December 22, 2015 01:32 AM2015-12-22T01:32:21+5:302015-12-22T01:32:21+5:30
नव्याने स्थापन झालेल्या आनंदनगर ग्रामपंचायतीवर काँग्रेस पुरस्कृत मोहोळकर गटाने एकहाती सत्ता संपादन केली.
वालचंदनगर : नव्याने स्थापन झालेल्या आनंदनगर ग्रामपंचायतीवर काँग्रेस पुरस्कृत मोहोळकर गटाने एकहाती सत्ता संपादन केली. नंदीकेश्वर ग्रामविकास पॅनलने सर्वच्या सर्व ९ जागा जिंकून विरोधी पॅनलचा दारुण पराभव केला. तर, जंक्शन ग्रामपंचायतीवर दुर्गामाता ग्रामविकास पॅनलने ९ पैकी ७ जागा जिंकून
सत्ता भोसले गटाने संपादन केली
आहे. त्यामुळे मोहोळकर आणि
भोसले यांनी आपापले गड राखल्याची चर्चा रंगली होती.
जंक्शन ग्रामपंचायतीच्या विभाजनानंतर प्रथमच आनंदनगर व जंक्शन ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. आनंदनगर ग्रांमपंचायतीसाठी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप पक्ष पुरस्कृत व ज्येष्ठ नागरिक यांनी पाठिंबा दिलेल्या दत्तकृपा ग्रामविकास पॅनलला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिगंबर देशपांडे यांनी काम पाहिले. या वेळी सुमारे ५ ते ७ नोटा मतदान झाले.
आनंदनगर ग्रामपंचायतीचे सरपंचपद मागसवर्गीय महिलेसाठी राखीव आहे. तर, जंक्शन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संजय मोहोळकर यांच्या नेतृत्वाखालील नंदीकेश्वर ग्रामविकास पॅनलला २ जागांवरच समाधान मानावे लागले.
कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक वसंत मोहोळकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, की हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वावर आणि काँगेस पक्षाच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांवर मतदारांनी विश्वास व्यक्त केला आहे. आनंदनगरच्या मतदारांनी नंदीकेश्वर ग्रामविकास पॅनलच्या सर्वच उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिले. विकासकामांवर लक्ष केंद्रित करून आनंदनगर ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामपंचायत बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.- वसंत मोहोळकर