दागिने हिसकावणा-या दोन सराईत गुन्हेगारांविरुद्ध मोकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:10 AM2021-04-10T04:10:52+5:302021-04-10T04:10:52+5:30
पुणे : शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, जनतेच्या मालमत्तेचे रक्षण व्हावे, कोणतेही अनुचित प्रकार घडू नये ...
पुणे : शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, जनतेच्या मालमत्तेचे रक्षण व्हावे, कोणतेही अनुचित प्रकार घडू नये आणि लोकांमध्ये भयमुक्त वातावरण राहावे, याकरिता गुंड, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होत आहे, तसे आदेश पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस अधिका-यांना दिले आहेत. त्यानुसार महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणा-या दोन सराईत गुन्हेगारांविरुद्ध मोकाअन्वये कारवाई करण्यात आली आहे.
अली अकबर हुसेन इराणी (वय ३०, रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी, इराणी वस्ती) आणि त्याचा साथीदार हैदर अली आब्बास अल्ली सिया (वय ३०) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
एक ६२ वर्षीय महिला वंशज प्रेस्टीज सोसायटी पाषाण-सूस रोड येथून जात असताना दुचाकीवरून मागून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या हाताला चापटी मारून त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावली. ही घटना १८ जानेवारीला रात्री ८.३० वाजता घडली. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनिट १ गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दोघा सराईतांना सापळा रचून पकडण्यात आले. त्यांच्याकडून ४ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यात ८५ ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि दुचाकीचा समावेश आहे. या दोघांविरुद्ध दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न सारखे गंभीर सात गुन्हे दाखल आहेत. टोळी प्रमुख अली अकबर हुसेन याने टोळीच्या अवैध आर्थिक प्राप्तीसाठी आणि टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हे गुन्हे केले आहेत. त्यांच्या संघटित टोळीच्या गुहेगारीस वेळीच पायबंद बसण्यासाठी त्यांच्याविरूद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९ च्या कलमांचा समावेश करावा, असा प्रस्ताव युनिट १ गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी यांनी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाटगे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना दिला होता. त्यानुसार मोराळे यांनी दोन्ही आरोपींविरूद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यास मंजुरी दिली. या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे करीत आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मोक्का कायद्याअंतर्गत केलेली ही २४ वी कारवाई असून, या वर्षातील ही १८ वी कारवाई आहे.
-----------------------------