लूटमार करणाऱ्या ओंकार गुंजाळ टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:57+5:302021-06-06T04:08:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नगर रस्त्यावर मोटारचालकाला धमकावून साडेतेरा लाखांची रोकड लुटणाऱ्या ओंकार गुंजाळ व त्याच्या टोळीवर महाराष्ट्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नगर रस्त्यावर मोटारचालकाला धमकावून साडेतेरा लाखांची रोकड लुटणाऱ्या ओंकार गुंजाळ व त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले.
प्रदीप ऊर्फ यशवंत कोंढाळकर (वय २३, रा. केसनंद, ता. हवेली), इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय १९, रा. बकोरीफाटा, वाघोली, नगररस्ता), ओंकार शंकर गुंजाळ (वय २४, रा. ओम शंकरनिवास, बकोरी रस्ता, लोणीकंद, नगर रस्ता), गणेश रामदास काळे (वय ३२, रा. वाघोली, नगररस्ता), विजय नंदू राठोड (वय २२, रा. सुयोगनगर, वाघोली, नगररस्ता) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
ओंकार गुंजाळ व त्याच्या साथीदारांनी दोन महिन्यांपूर्वी नगररस्त्यावर एका मोटारचालकाला अडवून त्याच्याकडील साडेतेरा लाखांची रोकड लुटली होती. या गुन्ह्याचा तपास करून गुन्हे शाखेने ओंकार गुंजाळसह पाच जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेली मोटार, दुचाकी तसेच चोरीच्या पैशांतून खरेदी केलेले मोबाईल, फ्रिज, शेगडी, कपडे, ब्ल्यू टुथ हेडफोन तसेच चोरलेली ७ लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
गुंजाळ टोळीप्रमुख असून त्याने साथीदारांच्या मदतीने लूटमार करणे, मारहाण करणे, जबरी चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे संघटितपणे केले आहेत. लोकांमध्ये दहशत पसरवून स्वत:चे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याकरिता गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना मोक्का प्रस्ताव पाठविला होता.
अशोक मोराळे यांनी प्रस्तावाची पडताळणी करून मोक्काचा अंर्तभाव करण्यास मंजुरी दिली. सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख पुढील तपास करीत आहेत.
वर्षातील २६ वी कारवाई
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही ३१ वी कारवाई असून या वर्षातील ही २६ वी कारवाई आहे.