हडपसर भागात दहशत माजविणाऱ्या टोळी प्रमुखाविरुद्ध मोक्का कारवाई
By नम्रता फडणीस | Published: January 3, 2024 04:29 PM2024-01-03T16:29:41+5:302024-01-03T16:30:01+5:30
दहशत माजविणाऱ्या टोळीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे
पुणे:हडपसर भागात दहशत माजवून वाहनांची तोडफोड करणारा टोळीप्रमुख सूरज उर्फ चुस बाळू माेहिते याच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली.
टोळीप्रमुख पसार असून, त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. सूरज उर्फ चुस बाळू मोहिते (वय २२), अनिकेत रवींद्र पाटोळे (वय २२), आदित्य रवींद्र पाटोळे (वय २०), तुषार बाळू माेहिते (वय १९), नवनाथ उर्फ लखन बाळू माेहिते (वय १९), हासनल अली शेनगो (वय १९), गौरव विजय झाटे (वय १९), ओंकार मारुती देढे (वय १९), पंकज विठ्ठल कांबळे (वय २०), रवींद्र बाबूराव पाटोळे (वय ४६), सचिन मारुती खंडाळे (वय २५, सर्व रा. वैदुवाडी, हडपसर) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांकडे तक्रार दिल्याने आरोपी सूरज आणि साथीदारांनी वैदुवाडी भागात एका तरुणावर शस्त्राने वार केले होते. वैदुवाडीतील दुकाने आणि वाहनांची तोडफोड करून आरोपी पसार झाले होते.
सूरज आणि साथीदारांनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले होते. त्यांच्याविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वास डगळे, संदीप शिवले यांनी तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त आर. राजा यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी नुकतीच मंजूरी दिली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील १०९ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.