सहकारनगर भागात दहशत माजवणाऱ्या गुंड टोळीवर ‘मोक्का’
By नितीश गोवंडे | Published: November 10, 2023 06:05 PM2023-11-10T18:05:00+5:302023-11-10T18:05:46+5:30
खुनाचा प्रयत्न, दरोडा घालणे, मारामारी असे गंभीर गुन्हे जाधवसह गुन्हेगारांविरुद्ध दाखल
पुणे : सहकारनगर भागात दहशत माजवणारा गुंड सनी जाधव याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.
सनी शंकर जाधव (२१, रा. चैत्रबन वसाहत, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), सलमान ऊर्फ सल्या हमीद शेख (२३, रा. बालाजीनगर) आणि वैभव ऊर्फ बबलू ऊर्फ मनोज विवेक कोठारी (२७, रा. धनकवडी) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. जाधव आणि साथीदारांनी पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर, काशीनाथ पाटीलनगर, धनकवडी भागात दहशत माजवली होती. या भागात त्यांनी गंभीर गुन्हे केले होते. खुनाचा प्रयत्न, दरोडा घालणे, मारामारी असे गंभीर गुन्हे जाधवसह साथीदारांविरुद्ध दाखल झाले आहेत.
जाधव टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी तयार केला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, स्मार्तना पाटील यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठवला होता. या प्रस्तावास पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मंजूर दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर करत आहेत. पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर रितेश कुमार यांनी शहरातील ८२ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.