पुण्याच्या कात्रज परिसरातील 'चुहा' गँगवर मोक्का
By विवेक भुसे | Published: September 12, 2022 08:57 PM2022-09-12T20:57:01+5:302022-09-12T20:57:32+5:30
ईस्माईल मौलाली मकानदार (वय २६), जावेद मेहबुब मुल्ला (वय २७), तौसिफ उर्फ मोसिन उर्फ चुहा जमीर सैय्यद (वय २८, सर्व रा. संतोषनगर कात्रज) अशी कारवाई झालेल्या टोळीप्रमुख व सद्स्यांची नावे आहेत
पुणे : कात्रज परिसरातील चुहा गँगवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी विरोधी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. ईस्माईल मौलाली मकानदार (वय २६), जावेद मेहबुब मुल्ला (वय २७), तौसिफ उर्फ मोसिन उर्फ चुहा जमीर सैय्यद (वय २८, सर्व रा. संतोषनगर कात्रज) अशी कारवाई झालेल्या टोळीप्रमुख व सद्स्यांची नावे आहेत.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ईस्माईल मकानदार आणि त्याच्या दोन साथीदारावर खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांनी हा गुन्हा परिसरात संघटीत गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व अबाधीत राखण्याच्या तसेच प्रभुत्व निर्माण करण्याच्या हेतूने केला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. आरोपींनी स्वतःचे व टोळीच्या अवैध आर्थिक फायद्यासाठी खूनाचा प्रयत्न, खंडणी, हत्यार जवळ बाळगणे, बेकायदेशीर जमाव एकत्र करणे, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. संबंधीत टोळीवर यापुर्वी देखील पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र त्यांचे गुन्हेगारी कृत्य त्यानंतर देखील सुरूच राहिले. दरम्यान त्यांच्या संघटीत गुन्हेगारीची दखल घेत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांना आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण करीत आहेत. गुप्ता यांनी पोलिस आयुक्त म्हणून पुणे शहराचा पदभार हाती घेतल्यापासून केलेली ही ९४ वी कारवाई आहे. तर चालू वर्षातील ही ३१ वी कारवाई आहे.