वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवणाऱ्या नितीन रणझुंजार टोळीवर मोक्का
By नितीश गोवंडे | Published: December 17, 2023 04:15 PM2023-12-17T16:15:17+5:302023-12-17T16:15:48+5:30
आरोपी नितीन रणझुंजार याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन मागील दहा वर्षात खुन, मृत्यू, जबरी चोरी, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत
पुणे : जमिन विकसनाच्या वादातून गॅरेजच्या शेडमध्ये लावलेल्या सहा दुचाकी पेट्रोल ओतून पेटवून देत तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवणाऱ्या नितीन दत्तात्रय रणझुंजार व त्याच्या अन्य २ साथीदारांवर पोलिस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत १०१ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.
जमिनीच्या विकसनाच्या वादातून टोळी प्रमुख नितीन रणझुंजार व त्याच्या साथीदारांनी गॅरजेमध्ये घुसत तेथे असलेल्या वॉचमनला धारदार हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच गॅरेजच्या शेड मध्ये लावलेल्या सहा दुचाकी वाहनांवर व चारचाकी वाहनांवर पेट्रोल ओतून आग लावली. तर गॅरेज परिसरात पार्क केलेल्या इतर सहा वाहनांची तोडफोड करुन नुकसान केले. तसेच गॅरेजच्या ऑफिसची तोडफोड करुन ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेले. यावेळी हातातील शस्त्र हवेत फिरवून मी एक मर्डर करुन जेलमधून बाहेर आलो आहे असे म्हणत दहशत पसरवली. हा प्रकार २८ नोव्हेबर रोजी धायरी येथील अंबाईमाता मंदिराजवळ घडला होता.
याप्रकरणी टोळी प्रमुख नितीन दत्तात्रय रणझुंजार (३३ रा. धायरीगाव), किरण युवराज भिलारे (२१, रा. मारुती मंदिराजवळ, धायरी), हर्षद नामदेव खोमणे (२३, रा. नाईक आळी, धायरी) यांच्यावर सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी नितीन रणझुंजार याने गुन्हेगारांची टोळी तयार करुन मागील दहा वर्षात खुन, मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, दरोडा, दहशत पसरवणे, मालमत्तेचे नुकसान करण्याच्या उद्देशाने स्फोटक पदार्थाने आग लावणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीने सिंहगड रोड, दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवली आहे.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्क्याचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलिस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे करत आहेत.