Pune: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघड; आरोपीला अटक
By नितीश गोवंडे | Published: March 21, 2024 03:47 PM2024-03-21T15:47:39+5:302024-03-21T15:48:58+5:30
ही घटना डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत पीडित मुलगी राहत असलेल्या धानोरी येथील घरात घडली आहे...
पुणे : अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत पीडित मुलगी राहत असलेल्या धानोरी येथील घरात घडली आहे.
याप्रकरणी पीडित १७ वर्षीय मुलीच्या आईने बुधवारी (दि. २०) विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अनिकेत बालाजी कांबळे (२३, रा. धानोरी) याच्यावर बलात्कारासह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. आरोपी अनिकेत मुलगी घरात एकटी असताना तिच्या घरी गेला. माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे आमिष तीला दाखवले. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गरोदर राहिल्यानंतर अखेर हे प्रकरण उजेडात आले. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक माळी करत आहेत.