अल्पवयीन मुलीचा विनयभंग; कुटुंबातील सदस्यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:12 AM2021-09-27T04:12:46+5:302021-09-27T04:12:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : पूर्ववैमनस्यातून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून मुलीच्या वडिलांसह चुलतीस शिवीगाळ व दमदाटी करत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चाकण : पूर्ववैमनस्यातून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून मुलीच्या वडिलांसह चुलतीस शिवीगाळ व दमदाटी करत लाकडी दांडक्याने, कोयता व पट्ट्याने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील करंजविहीरे ( ता. खेड) येथील दलित वस्तीवर हा प्रकार घडला. चाकण पोलिसांनी याप्रकरणी चौघांवर शनिवारी (दि. २५ ) गुन्हा दाखल केला.
मुलीच्या आईने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून चौघांवर बाल लैंगिक अत्याचारासह अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मोहित चंद्रकांत कोळेकर (रा. करंजविहीरे, ता. खेड), विकी बबन येलसटे (रा. झित्राई मळा, चाकण ) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाचा राग मनात धरून कोळेकर याने आपल्या तीन साथीदारांसह फिर्यादीच्या घरात जबरदस्तीने घुसून मुलीचा विनयभंग करून फिर्यादीच्या पतीला आणि जावेला लाकडी दांडके, कोयता आणि पट्ट्याने जबर मारहाण करून जखमी केले, तर दाेघांना अटक केली. फरार दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.