अल्पवयीन मुलींचा विनयभंग प्रकरण : विद्यार्थ्यांचे तातडीने स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 03:14 AM2018-01-30T03:14:39+5:302018-01-30T03:14:50+5:30
जुन्नर तालुक्यातील येणेरे येथील इंडियन इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापक-संचालकावर शाळेच्या वसतिगृहातील १२ ते १३ वर्षे वयाच्या मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी तक्रारींनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या भेटीनंतर तातडीने २२७ मुलामुलींना डहाणू, जवाहर येथील प्रकल्प कार्यालयात तसेच आश्रमशाळेत स्थलांतरित केले.
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील येणेरे येथील इंडियन इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापक-संचालकावर शाळेच्या वसतिगृहातील १२ ते १३ वर्षे वयाच्या मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी तक्रारींनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या भेटीनंतर तातडीने २२७ मुलामुलींना डहाणू, जवाहर येथील प्रकल्प कार्यालयात तसेच आश्रमशाळेत स्थलांतरित केले.
कालच्या या घटनेनंतर या मुलांच्या पालकांनी जवाहर, डहाणू येथे गर्दी करून मागणी केल्याने या मुलामुलींना तातडीने पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांच्या ५ स्कूलबसमधून या विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्थलांतरित करण्यात आले. तर, १३ विद्यार्थी व विद्यार्थिनी रविवारीच पालकांबरोबर रवाना झाले होते. आज स्थलांतर करण्यात आलेल्या मुलांमुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे समजते. त्यानंतर तेथील प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून त्यांची शाळेची पुढील व्यवस्था करण्यात येईल.
दरम्यान, या प्रकारातील आरोपी सचिन घोगरे याला खेड सत्र न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त चंद्रकांत डांगे, प्रकल्पधिकारी पवनित कौर, घोडेगाव प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांनी तातडीने या शाळेत भेट दिली. या शाळेच्या वसतिगृहाचे कामकाज कसे चालते, विद्यार्थी राहण्याची व्यवस्था शासनाच्या निकषांप्रमाणे आहे की नाही, याची शहानिशा केली. याची जबाबदारी असणाºया आदिवासी विकास विभागाने नामांकित शाळा म्हणून या शाळेत विद्यार्थी कसे पाठविले, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दरम्यान, या विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी आज शाळेत आल्यानंतर चौकशीचा फार्स करून या विद्यार्थ्यांना शाळेच्या वसतिगृहातून तातडीने बाहेर काढून स्थलांतर कसे करता येईल हे पहिले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. संबंधित आधिकारी केवळ सारवासारव करण्यासाठीच आले होते, असा आरोप स्थानिक कातकरी समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी कातकरी, वारली, ठाकर समाजांतील २४१ मुले-मुली आहेत. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी आहेत. तर, स्थानिक ८१ मुले नामांकित शाळांत दाखल करण्यात येते. लाखो रुपये अनुदानाचा विनियोग कसा होतो, हा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
या शाळेत तसेच वसतिगृहात आदिवासी समाजाचे विद्यार्थी एवढ्या मोठ्या प्रमाणात शिकत आहेत, याची कल्पना तालुक्यातील आदिवासी
भागातील आश्रमशाळांच्या शिक्षक व कर्मचारी वर्गालादेखील नव्हती. तर, या शाळेचे व वसतिगृहाचे कामकाज कसे चालते, याची येणेरेतील स्थानिक ग्रामस्थांनादेखील फारशी माहिती नव्हती. दरम्यान, आधिका-यांनी भेट दिल्यानंतर वसतिगृहात निवासव्यवस्था, स्वछतागृहे आदींबाबत गंभीर त्रुटी असल्याचे आढळून आले. तर, महसूल विभागाच्या सूत्रानुसार वसतिगृहाच्या इमारतीच्या बांधकामाच्या वैधतेबाबत शंका व्यक्त करण्यात आली.
पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ, केंद्रप्रमुख डी. ए. शेलकंदे यांनीदेखील भेट देऊन अहवाल तयार केला आहे.
आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वसतिगृहात भेट दिल्यानंतर कातकरी समाजाच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या कोणत्याही तक्रारीकडे ध्यान दिले नाही. तर, छायाचित्रण करणाº्या स्थानिक वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनादेखील मज्जाव करण्यात आला.