कायमस्वरूपी कामाच्या आमिषाने महिलेचा विनयभंग
By admin | Published: May 7, 2017 02:34 AM2017-05-07T02:34:31+5:302017-05-07T02:34:31+5:30
सणसवाडी (ता. शिरूर) येथील औद्योगिक क्षेत्रातील ट्रान्स अॅटो या कारखान्यात तात्पुरत्या स्वरुपात काम करणाऱ्या महिलेला कायमस्वरूपी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील औद्योगिक क्षेत्रातील ट्रान्स अॅटो या कारखान्यात तात्पुरत्या स्वरुपात काम करणाऱ्या महिलेला कायमस्वरूपी कामाला लावण्याचे आमिष दाखवून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कारखान्याचे असिस्टंट मॅनेजर सुधीर देशमुख यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळची सोलापूर येथील राहणारी महिला सणसवाडी येथील ट्रान्स अॅटो इंटरनॅशनल या कारखान्यात सहा महिन्यांपूर्वी तात्पुरत्या स्वरुपात आॅफिसमध्ये काम करीत होती. कारखान्याचे असिस्टंट मॅनेजर सुधीर देशमुख याने या महिलेस तुम्हाला कायमस्वरूपी कामाला लावतो, असे म्हणत जवळीक व ओळख निर्माण केली.
यांनतर या महिलेस कारखान्यातील रेकॉर्डरूममध्ये फायली आणायला देशमुख यांनी सांगितल्यावर ती महिला रेकॉर्डरूममध्ये गेली असता सुधीर देशमुख त्या ठिकाणी गेला व त्या महिलेस माझी इच्छा पूर्ण करा, असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करूनही महिलेने प्रतिसाद न दिल्याने त्या महिलेला कामावरून काढून टाकले. त्या महिलेने डिसेंबर महिन्यात तुम्ही मला कामावरून का काढले, तसेच माझ्या नावाची बदनामी का करता, याचा जाब विचारण्यास गेलेल्या महिलेच्या थोबाडीत सुधीर देशमुख याने मारली. त्यांनतर या महिलेने हा प्रकार आपल्या पतीस सांगितला होता. ३ मे रोजी सुधीर देशमुख याने त्या महिलेच्या पतीस फोन करून तुझी पत्नी वाईट वागते, असे सांगितले.
यानंतर ५ मे रोजी या महिलेने शिक्रापूर पोलीस ठाण्यात ट्रान्स अॅटो इंटरनॅशनल कारखान्याचे असिस्टंट मॅनेजर सुधीर शिवाजी देशमुख (रा. चंदननगर, पुणे) यांच्याविरुद्ध तक्रार दिली असून देशमुख याच्यावर महिलेचा विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दत्तात्रय शिंदे करीत आहेत.