विद्यापीठात तरूणीची छेडछाड करणाऱ्या तरूणाला सुरक्षारक्षकांनी पाठलाग करून पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 09:28 PM2019-12-13T21:28:57+5:302019-12-13T21:38:46+5:30
विद्यापीठात कायदा हातात घेणाऱ्याना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न
पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ आवारात सायंकाळी तरूणीची छेड काढून पळून जाणाऱ्या तरूणास सुरक्षारक्षकांनी पाठलाग करून पकडले. तरूणाने हटकल्यानंतर ती ओरडल्याने परिसरातील सुरक्षारक्षक तातडीने तिथे पोहचले. त्यांना पाहून तरूण पळून जात असताना पेट्रोलिंग करणाऱ्या सुरक्षारक्षकांनी त्याचा पाठलाग केला. या तरूणाला चतुश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
विद्यापीठातील टपाल कार्यालयासमोर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सखाराम त्र्यंबक वर्पे (रा. बोपोडी, मुळ - बीड) असे छेड काढणाऱ्या तरूणाचे नाव आहे. ही तरूणी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास टपाल कार्यालयासमोरून वसतिगृहाकडे निघाली होती. यावेळी एक जणाने मागून येत तिची छेड काढली. घाबरलेल्या तरूणी आरडाओरड केल्यानंतर तरूण पळू लागली. यावेळी परिसरात असलेला सुरक्षा रक्षक आवाजाच्या दिशेने धावत आला. लगेचच घडलेल्या प्रकाराची माहिती पेट्रोलिंग जीपमधील सुरक्षारक्षकांना देण्यात आली. काही वेळात ही जीप तिथे आल्यानंतर तरूण पळाल्याच्या दिशेने गेली. तरूण जवळपास लपला असल्याच्या शक्यतेने त्यांनी सर्च लाईटने परिसरात त्याचा शोध घेतला. तेव्हा त्यांना तो एलिस गार्डनच्या परिसरात लपलेला आढळून आला. सुरक्षारक्षकांना पाहून तो धावत असताना त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. त्याच्याकडे काही शस्त्र, हत्यार होते का किंवा त्याने ते गार्डनच्या परिसरात टाकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.
---------------
विद्यापीठातील विशेष सुरक्षा पथकाने सतर्कता दाखवून विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या तरूणाला पकडले. त्यांनी दाखविलेली सतर्कता कौतुकास्पद आहे. तरूणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यापुढे विद्यापीठात कायदा हातात घेणाऱ्याना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांच्या मदतीने प्रयत्न केले जातील.
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ