आधी आमिष दाखवून बलात्कार; मग खालच्या जातीची म्हणून लग्नास नकार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 08:23 PM2023-08-30T20:23:05+5:302023-08-30T20:24:17+5:30
आरोपीला न्यायालयाने ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला....
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने मुलीवर वारंवार बलात्कार केला. मुलीने लग्नाची विचारणा केल्यावर तू खालच्या जातीची आहेस, असे सांगत तिला नकार देणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.
श्रीनाथ भाऊसाहेब कोडग असे जामीन मंजूर केलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांची लातूर, उदगीरमध्ये एका कार्यक्रमात ओळख झाली. त्यानंतर मुलीने फेसबुकवर त्याला रिक्वेस्ट पाठवली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यात त्यांचे संबंध आले. त्यांचे चार वर्षे प्रेम प्रकरण होते. त्यामध्ये त्यांचे सतत वाद अणि मतभेद होत होते. त्यानंतर ते दोन वर्षे संपर्कात नव्हते. मुलाने मला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. लग्नाचे बोलले की तो टाळायचा. मी खालच्या जातीची असल्याने माझे - तुझे लग्न होऊ शकत नाही, असे म्हटल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले. त्यानुसार श्रीनाथ कोडग याला १४ ऑगस्ट रोजी अटक झाली आणि १७ ऑगस्ट रोजी न्यायालयीन कोठडी झाली हाेती.
श्रीनाथ कोडग याने ॲड. नीलेश वाघमोडेमार्फत जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणामध्ये ३७६ हे कलम लागू होत नाही. दोघांनी मिळून संबंध ठेवले होते अणि लग्नाचे कोणतेही वचन दिले नव्हते आणि गुन्हा दाखल करायला अनपेक्षित उशीर झाला आहे. त्याचे कोणतेही कारण दिले नाही. उलट मुलगी वारंवार त्रास देत आहे अणि मुलगी मानसिक विकृत आहे, असा युक्तिवाद ॲड. वाघमोडे यांनी केला. त्याला सरकारी वकिलांनी कडाडून विरोध केला. दोघांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीची अटी, शर्तींवर मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. वाघमोडे यांच्यासह ॲड. महेश देशमुख आणि ॲड. चंद्रसेन कुमकर यांनी काम पाहिले.