आई, बाबा तुम्ही भांडू नका आता मला राग येतोय! लॉकडाऊनने निर्माण केले नवे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 11:54 AM2020-07-23T11:54:31+5:302020-07-23T11:57:11+5:30

कुटुंबातील पालकांचे वर्क फ्रॉम होम असल्याने छोट्या छोट्या कारणांनी वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे..

Mom, Dad, don't quarrel , I'm angry now! Lockdown created new questions | आई, बाबा तुम्ही भांडू नका आता मला राग येतोय! लॉकडाऊनने निर्माण केले नवे प्रश्न

आई, बाबा तुम्ही भांडू नका आता मला राग येतोय! लॉकडाऊनने निर्माण केले नवे प्रश्न

Next
ठळक मुद्देपालकांमधील विसंवाद ठरतोय मुलांच्या नैराश्यामागील कारण 

युगंधर ताजणे

पिंपरी : लॉकडाऊनमुळे आई बाबा दोघेही घरात आहेत.  त्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु आहे. सतत छोट्या मोठ्या कारणांमुळे त्यांच्यात वाद होत आहेत. कोरोनामुळे घराबाहेर पडता येत नसल्याने मोठी अडचण आहे. कुठे खेळायला जाता येत नाही. फिरता येत नाही, मित्रांना भेटायला जाता येत नाही. सुरुवातीला आम्हाला कधीही वेळ न देणारे आईबाबा आता स्वत:च सारखे भांडायला लागल्याने त्याचा राग आमच्यावर निघत असल्याची तक्रार लहान मुलांबरोबरच तरुणांची देखील आहे. 

 घरी भाजी घेऊन येताना ती रस्त्यात सांडल्याने आई वडिलांचा ओरडा खावा लागला. याचा राग आल्याने एका चिमुरडयाने बाथरुम मध्ये गळफास घेतला. बहिणीबरोबर झालेले भांडण यावर घरच्यांकडून झालेला अपमान सहन झाल्याने तरुणाने स्वत:ला संपवले. चौदा वर्षाच्या एका मुलाने घरगुती कारणातून आत्महत्या केल्याची घटना घडली. लॉकडाऊनच्या काळात क्षुल्लक कारणावरुन आत्महत्या करण्याच्या 20 पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. वर्षभरात भारतात दोन ते अडीच लाख आत्महत्या होतात. त्यातील अधर््याहून वयवर्षे 15 ते 30 या वयोगटातील आहेत. तरुणगटाचे प्रमाण अधिक आहे. याबाबत अधिक माहिती देताना ज्ञानदेवी चाईल्ड लाईनच्या संचालक अनुराधा सहस्त्रबुध्दे म्हणाल्या, लॉकडाऊनचा पहिला आठवडा लहान मुलांकरिता अधिक गोंधळाचा होता. खेळायला घराबाहेर जाता न येणे, दैनंदिन वेळापत्रकात झालेला बदल, सध्या आॅनलाईन शिक्षणाचा त्यांच्यावर पडलेला ताण यासगळयाचा विचार करावा लागेल. आता पालकदेखील मोठ्या बिकट परिस्थितीतून जात आहेत. कामावर कसे जायचे हा त्यांच्यापुढील महत्वाचा प्रश्न आहे. मुले खुप संवेदनशील असतात. त्यांना लावलेल्या सवयी आणि सद्यस्थिती याच्याकडे पाहिल्यास त्यांच्या वागण्या बोलण्यातील तफावत जाणून घेता येईल. 


* लॉकडाऊनमध्ये कुटूंबातील संघर्षाचे प्रमाण वाढले आहे. यात आई वडिलांमधील वाद हे एक महत्वाचे कारण आहे. सतत एकमेकांसमोर असणे, छोट्या मोठ्या कारणांमधून झालेल्या तक्रारी याचा परिणाम संवादावर झाला आहे. घरातील लहानमुले हे सगळे पाहत आहेत. आत्महत्यामागील मुख्य कारण काय हे शंभर टक्के अचूकरीत्या सांगता येणार नाही. यातील काहींना जुने मानसिक आजार असतात. नैराश्य, व्यसनांच्या आहारी जाणे याचा विचार करावा लागेल. मुल अचानक शांत झाले किंवा त्याने टोकाचे विचार बोलुन दाखवले तर मानसोपचारतज्ञांची मदत घ्यायला हवी.   ‘मी आत्महत्या करणार असे जो बोलून दाखवतो तो आत्महत्या करणार नाही.’ असे म्हणतो तो ते करणार नाही. असा आपल्याकडे मोठा गैरसमज आहे. असे कुणी बोलत असेल तर त्याचा गांभीर्याने विचार करावा. - डॉ. भुषण शुक्ला, बालमानसोपचारतज्ञ 

*  नैराश्यग्रस्तांना समुपदेशन करण्यासाठी कार्यरत असणा-या कनेक्टिंग एनजीओकडे लॉकडाऊनच्या काळात दिवसाला 15 ते 18 फोन येत आहेत. महिन्याला 450 पेक्षा जास्त मुले, तरुण आपल्या समस्या या समुपदेशकांकडे मांडत आहेत. यातील वयोगट प्रामुख्याने 14 ते 45 दरम्यानचा आहे. घरगुती भांडणे, आईवडिलांमधील बेबनाव, मुलांना होणारी मारहाण, आर्थिक समस्या, परस्परांमधील संवादाचा अभाव ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याची माहिती संबंधित संस्थेकडून देण्यात आली.

Web Title: Mom, Dad, don't quarrel , I'm angry now! Lockdown created new questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.