मम्मी-पप्पा माझा हट्ट पुरवा, मतदान नक्की करा! पाल्यांनी लिहिले पालकांना पत्र
By श्रीकिशन काळे | Published: November 15, 2024 03:20 PM2024-11-15T15:20:59+5:302024-11-15T15:22:23+5:30
सीमेवर सैनिक जसे देशाच्या संरक्षणासाठी तत्पर असतात, तसे तुम्ही देखील एक कर्तव्य करा, येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान करा
पुणे : ‘‘तुम्ही माझे खूप लाड करता, माझे सर्व हट्ट पुरवता, आज मी तुमच्याकडे एक वेगळा हट्ट करणार आहे. आपला भारत सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे. सीमेवर सैनिक जसे देशाच्या संरक्षणासाठी तत्पर असतात, तसे तुम्ही देखील एक कर्तव्य करा, येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान करा, माझ्या भविष्यासाठी मतदान करा,’’ असे पत्र पाल्यांनी आपल्या पालकांना लिहून मतदान जागृती केली.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत पुण्यात खूप कमी मतदान झाले होते. पुणे शहर हे शैक्षणिक, सांस्कृतिक, आयटी हबची राजधानी समजली जाते. त्यामुळे या ठिकाणी सर्वात सुशिक्षित नागरिक राहतात. परंतु, मतदान करायला मात्र घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळेच या विधानसभेत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लहान मुलांपासून ते शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मतदान जागृती करत आहेत. तसेच शारदा विद्यालय,सेनादत्त पेठ येथे पालकसभा झाली. त्यामध्ये मतदार जनजागृती करून सिव्हिल ॲप, केवायसी ॲपबाबत माहिती देण्यात आली. तसेच मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले आणि मतदारांची प्रतिज्ञा घेण्यात आली. रेणुका स्वरूप मेमो. गर्ल्स हायस्कूल,सदाशिव पेठ यांनी स. प. महाविद्यालय चौकामध्ये मानवी साखळी निर्माण करून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. तसेच ट्राफिक सिग्नलवर थांबलेल्या वाहनासमोर मतदान जनजागृतीपर पोस्टर व घोषणा देण्यात आल्या. आरसीएम गुजराथी शाळा,फडके हौद चौक येथे विद्यार्थ्याकरिता मतदान जागृतीबाबत रांगोळी स्पर्धा, सायकल रॅली, मानवी साखळी इ. कार्यक्रम आयोजिले होते. नोबेल इंग्लिश मेडियम स्कूल येथे विद्यार्थ्याकरिता मतदान जागृतीबाबत रांगोळी स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजिले होते. डॉ. सायरस पूनावाला शाळा,रास्ता पेठ येथे मतदार जनजागृती रॅली झाली.
भिक्षेकऱ्यांनी केली जनजागृती
सोहम ट्रस्टचे डॉ. अभिजित सोनवणे, डॉ. मनीषा सोनवणे यांच्यातर्फे मतदान जागृती करण्यात येत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जवळपास २०० भिक्षेकऱ्यांना त्यांनी एकत्र करून ‘चला आपण सारे मतदान करूया’ अशा आशयाचा फलक हातात धरून जनजागृती केली. भीक मागणारे लोक मतदानासाठी जनजागृती करताना पाहून नागरिक देखील अचंबित झाले. भीक मागणाऱ्या हजार लोकांची ताकद आमच्या मागे आहे. या ताकदीचा वापर आम्ही विधायक कामांसाठी करत आहोत, असे डॉ. अभिजित सोनवणे म्हणाले.
मुलांनी केला व्हिडिओ !
लहान मुलांनी देखील व्हिडिओच्या माध्यमातून मतदान नक्की करा, असा संदेश दिला आहे. काही शिक्षण संस्थांनी देखील यासाठी पुढाकार घेतला आहे. हा व्हिडिओ व्हॉट्सअप व सोशल मीडियावर पाठविला जात आहे.
पत्रलेखन उपक्रम
कसबा पेठ विधानसभा मतदार संघात स्वीप अंतर्गत नवीन मराठी शाळा, पुणे येथे मतदान जागृतीबाबत पालकांना मतदान करण्याबाबत पत्रलेखन उपक्रम नुकताच झाला.