आई, मी इतकी कशी गं नकोशी? पुणे शहरात गेल्या ११ महिन्यात ११ अर्भके फेकली रस्त्यातच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 10:01 AM2023-12-21T10:01:04+5:302023-12-21T10:01:28+5:30
माणुसकीवरचा विश्वास उडणाऱ्या या घटना पाहिल्या की ‘आई, तूच कशी झाली ग वैरिणी’ असे नि:शब्द बोल त्या नवजात बालकाच्या डोळ्यातून अश्रूंवाटे बाहेर तर पडत नसतील ना? असा सवाल उपस्थित हाेताे....
- नम्रता फडणीस
पुणे : एकीकडे देशभरात 'बेटी बचाओ बेटी पढाओ'चा नारा बुलंद केला जात आहे. तरीही "नकोशी' झालेल्या पोटाच्या गोळ्याला थंडी-वाऱ्यात रस्त्यावर किंवा कचऱ्याच्या पेटीत फेकून देण्याच्या घटना वाढतच आहेत. माणुसकीवरचा विश्वास उडणाऱ्या या घटना पाहिल्या की ‘आई, तूच कशी झाली ग वैरिणी’ असे नि:शब्द बोल त्या नवजात बालकाच्या डोळ्यातून अश्रूंवाटे बाहेर तर पडत नसतील ना? असा सवाल उपस्थित हाेताे.
या घटना सर्वांचेच मन हेलावून टाकत असल्या तरी अनैतिक, बळजबरी संबंधातून किंवा मुलगी नको म्हणून कुटुंबाच्या दबावामुळे अर्भके रस्त्यावर किंवा उकिरड्यावर फेकून देण्याचे प्रमाण पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरातही वाढले आहेत. गेल्या दोन वर्षात पुण्यात २२ अर्भक फेकून देण्यात आल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्यावर अर्भक फेकून देण्याचे प्रमाण हे महाराष्ट्रात सर्वाधिक असून, गेल्या सहा वर्षात राज्यात तब्बल १ हजार ३१ जिवंत अर्भकांना रस्त्यावर फेकून देण्यात आले आहे.
शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला हिरवा कंदील मिळाला, ही अभिमानास्पद बाब घडलेली असतानाच दुसरीकडे सावित्रीच्याच लेकींना रस्त्यावर टाकून दिल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात घडते, ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.
कडाक्याच्या थंडीत रात्रीच्या अंधारात जन्मदात्या आईनेच जंगलातल्या काट्याकुट्यात पोटच्या गोळ्याला फेकून दिले. माणुसकी जिवंत असलेल्या संवेदनशील लाेकांनी त्या अर्भकाला तातडीने रुग्णालयात दाखल केले म्हणून ते चिमुकले पुन्हा किलकिल्या डोळ्यांनी हे जग पाहू शकले. पण, या बालकांसारखे सर्वांचेच नशीब बलवत्तर असते असे नाही. किती तरी नवजात अर्भक थंडी वाऱ्यात तग धरू शकत नाहीत. त्यांचे डोळे कायमचे मिटतात. पण, कुटुंबाला काहीच वाटतं नाही, किती ही निष्ठूरता?
मुलगी जन्माला येण्यात फक्त तिलाच का देता दोष? :
दोघांच्या गुणसुत्रांच्या संयोगावर मुलगी की, मुलगा जन्माला येणार हे ठरते. फक्त तिचाच दोष कसा? तरीही कारण कोणतेही असो, निर्दयी पालक नवजात अर्भकांना कचराकुंडीत फेकून कसे काय देतात? हाच प्रश्न आहे. तुम्हाला मूल नको असेल तर त्यांना अनाथालयात का सोडत नाहीत? फेकून का देता? शहरात कितीतरी अनाथालय किंवा बालसंगोपन करणाऱ्या संस्था आहेत. त्या मुलांचा योग्य प्रकारे सांभाळ करू शकतात. नकोशा बाळांना फेकून देणे हा पर्याय आहे का? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत. पुण्यातही गेल्या वर्षभरात मंचर, जुन्नरसह सिंहगड रस्त्याच्या भागात नवजात अर्भक फेकून देण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
घटना १ :
१० जानेवारी :
मुलीला जन्म दिल्यानंतर तिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून देण्यात आले. सीसीटीव्हीच्या आधारे आईला मंचर पोलिसांनी तीन तासात पकडले. आईपणाच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात घडली.
५ फेब्रुवारी :
पुण्यात आईने नवजात मुलीचे अपहरण केल्याचा बनाव रचला. नंतर नवजात बाळाला आईनेच कालव्यात फेकून दिल्याचे समोर आले. जुन्नर तालुक्यातून ही धक्कादायक घटना समोर आली.
१५ डिसेंबर :
सिंहगड रस्ता परिसरातील धायरी फाटा येथील सणस शाळेजवळील एका दुकानापुढे मुख्य रस्त्यावर कचऱ्यात पुरुष जातीचे एक नवजात अर्भक मृत अवस्थेत सापडले. एका कचरा वेचकाला ते सापडले. पोलिस निर्दयी पालकांचा शोध घेत आहेत.
शहरात इतकी अर्भके दिली फेकून :
परिमंडळ २०२२ २०२३ (नोव्हेंबर)
१ - ० - ०
२ - २ - ०
३ - ४ - ३
४ - ३ - ६
५ - २ - २
एकूण - ११ - ११
मुलगी किंवा मुलगा हाेणे हे पुरुषांच्याच गुणसूत्रांवर अवलंबून असते. पुरुषांचे सेक्स गुणसूत्र हे ‘एक्स’ व ‘वाय’ असतात. तर स्त्रियांचे गुणसूत्र हे ‘एक्स’- ‘एक्स’ असतात. जेव्हा ‘एक्स’ - ‘एक्स’ जवळ येतात तेव्हा मुलगी हाेते आणि ‘एक्स’ व ‘वाय’ एकत्र येतात तेव्हा मुलगा हाेताे. काेणते गुणसूत्र एकत्र येतात ते काेणाच्याच हातात नसते.
- डाॅ. याेगेश गाडेकर, स्त्रीराेगतज्ज्ञ