‘मॉम इज इनसाइड, डोंट गो इन... कॉल द पोलिस’ पुण्यात उच्चशिक्षित मुलानेच घेतला आईचा ‘घाेट’

By नितीश गोवंडे | Published: May 30, 2024 03:11 PM2024-05-30T15:11:02+5:302024-05-30T15:12:32+5:30

संगणक अभियंता मुलाने शिक्षिका असलेल्या आईचा चाकूने भोसकून खून केला...

'Mom is inside, don't go in... call the police' In Pune, a highly educated boy murdered his mother | ‘मॉम इज इनसाइड, डोंट गो इन... कॉल द पोलिस’ पुण्यात उच्चशिक्षित मुलानेच घेतला आईचा ‘घाेट’

‘मॉम इज इनसाइड, डोंट गो इन... कॉल द पोलिस’ पुण्यात उच्चशिक्षित मुलानेच घेतला आईचा ‘घाेट’

पुणे : उच्चशिक्षित तरुणाने दारूसाठी जन्मदात्या आईचा खून करून मृतदेह बाथरूममध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार काेंढव्यात घडल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर आराेपी मुलाने घराच्या दारावर ‘मॉम इज इनसाइड, डोंट गो इन... कॉल द पोलिस’ असे लिहून फरार झाला. जाताना त्याने आईचा मोबाइलही लंपास केल्याचे पुढे आले असून, पोलिस आराेपीचा शोध घेत आहेत.

अधिक माहितीनुसार, संगणक अभियंता मुलाने शिक्षिका असलेल्या आईचा चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर आईचा मृतदेह बाथरूममध्ये टाकून पळ काढला. ही घटना एनआयबीएम रोड, कोंढवा येथील कुबेरा गार्डन सोसायटीत दि.२४ ते २८ मे यादरम्यान घडली. मृतदेह कुजल्याने फ्लॅटमध्ये दुर्गंधी सुटली आणि खून झाल्याचे समाेर आले. लता आल्फ्रेड बेंजामिन (७३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी मिलिंद आल्फ्रेड बेंजामिन (४३) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. याबाबत डॉर्थी मोजेस पनमोजेस (४९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी आणि आरोपी बहीण-भाऊ आहेत. आरोपी मिलिंद याला दारूचे व्यसन आहे. कोरोनाकाळात नोकरी गेल्यापासून तो बेरोजगार हाेता. मिलिंद आणि त्याची आई लता बेंजामिन हे दोघे कुबेरा गार्डन सोसायटीत एकत्र राहत होते. मिलिंद हा दारू पिण्यासाठी पैसे मिळावे म्हणून आईसोबत सतत भांडत असे. त्यातूनच त्याने चाकूने भोसकून लता आल्फ्रेड बेंझामिन यांचा खून केल्याचा संशय व्यक्त हाेत आहे.

...अन् गुन्ह्याला वाचा फुटला :

फिर्यादी आणि त्यांची बहीण या दोघी नियमित आईसोबत फोनद्वारे संपर्कात असत, आई त्यांना मिलिंद दारूसाठी वाद करत असल्याचे सांगत होती. २४ मे रोजी फिर्यादी यांचे आईसोबत बोलणे झाले होते. २६ मे रोजी फिर्यादींनी आईच्या मोबाइलवर मेसेज केला. मात्र, उत्तर आले नाही. फोन केला असता, तोदेखील उचलला नाही. त्यामुळे त्यांनी बहिणीला फोन करून माहिती दिली. आई शाळेच्या कामात व्यस्त असल्याचे वाटले. २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सोसायटीतील लोकांनी आई राहत असलेल्या फ्लॅटमधून वास येत असल्याचे सांगितले. त्यानुसार फिर्यादींनी घरी जाऊन पाहिले तेव्हा दरवाजा बंद दिसला. प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले तेव्हा आईचा मृतदेह बाथरूमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

आरोपी मुलाला दारूचे व्यसन आहे. पैशासाठी तो आईसोबत वाद करत होता. त्याने चाकूने वार करून आईचा खून केला आहे. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

- संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा

Web Title: 'Mom is inside, don't go in... call the police' In Pune, a highly educated boy murdered his mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.