‘श्रीं’च्या आगमन मुहूर्तावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:16 AM2021-08-18T04:16:25+5:302021-08-18T04:16:25+5:30
विजय गोखले : जगण्याचा संघर्ष सोपा व्हावा लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “ कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांहून अधिक ...
विजय गोखले : जगण्याचा संघर्ष सोपा व्हावा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “ कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ सांस्कृतिक चळवळ खंडित झाली आहे. अभिनेते, गायक, दिग्दर्शक आदी कलाकारांपासून पडद्यामागील कलाकारांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे. ‘श्रीं’च्या आगमनाच्या मुहूर्तावर नाट्यगृहांची आणि ओघाने कलाकार व पडद्यामागील तंत्रज्ञ, कलाकार यांचीही प्रतीक्षा संपावी,” अशी अपेक्षा अभिनेते विजय गोखले यांनी व्यक्त केली.
कोरोनाने कलाकारांची परिस्थिती बिकट केली आहे. तरी पडद्यामागील कर्मचाऱ्यांनी परिस्थितीशी संघर्ष थांबवलेला नाही. या संघर्षातून श्री गणरायच मार्ग काढतील, असा विश्वास बाळगत पडद्यामागील कलाकार रणजित सोनावळे यांनी श्रींच्या मूर्तींचा स्टॉल टाकला आहे. विजय गोखले यांच्या हस्ते आणि संवाद (पुणे) व अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्टॉलचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी गोखले बोलत होते. या वेळी अशोक सोनावळे, रणजित सोनावळे, कौस्तुभ सोनावळे, मनोरंजन संस्थेचे मनोहर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
गोखले म्हणाले, रंगमंचीय आविष्कार बंद असल्याने कलेचे उपासक असलेल्या पडद्यामागच्या कलाकारांसमोर जगायचे कसे,असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा वेळी स्वत:च्या उपजीविकेसाठी बुद्धीचातुर्याचा वापर करून आणि कोणत्याही स्तरावर जाऊन कष्ट उपसण्याची तयारी दाखवत हे कलाकार जगण्याचा संघर्ष करीत आहे. आपण त्यांच्या या सकारात्मक प्रयत्नांना प्रतिसाद द्यायला हवा. रणजित सोनावळे यांनी सूत्रसंचालन केले. अशोक सोनावळे यांनी आभार मानले.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------