अंतिम वर्षाच्या परीक्षेला १२ ऑक्टोबरनंतरचा 'मुहूर्त' ; प्रश्नसंच तयार करण्याचे काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 02:39 PM2020-09-28T14:39:23+5:302020-09-28T14:42:42+5:30
अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या १ ऑक्टोबरपासून घेण्याचे निश्चित केले असले तरी; अद्याप सर्व विषयांचे प्रश्नसंच तयार करण्याचे काम पूर्ण झाले नाही.तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 'नेट', 'यूपीएससी' व 'एमपीएससी'च्या परीक्षा असल्यामुळे विद्यापीठाने परीक्षेसाठी येत्या १२ ऑक्टोबरनंतरचा मुहूर्त काढला असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
सर्वोच्च न्यायालय व राज्य शासनाच्या आदेशानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या कामाला तात्काळ सुरुवात केली. विद्यापीठाच्या अधिष्ठाता त्यांनी सर्व विषयाच्या अभ्यास मंडळाची बैठक घेऊन प्रश्नसंच तयार करण्याबाबत सूचना दिल्या. २३ सप्टेंबरपर्यंत सर्व विषयाचे प्रश्नसंच तयार होणे अपेक्षित होते. मात्र, मराठी व इंग्रजी भाषा विषयातील प्रश्नसंच तयार करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक असणारे ' एमसीक्यू' चे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. प्रश्नसंच तयार करण्याचे काम सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत झाले आहे. त्यामुळेच विद्यापीठाने प्रत्येक विषयाच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध केले नाही.
विद्यापीठातर्फे १ ते ९ ऑक्टोबरपर्यंत 'बॅकलॉग'च्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. तर १० ते ३० ऑक्टोबर या कालावधीमध्ये नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले होते. मात्र, आता बॅकलॉग च्या विद्यार्थ्यांची परीक्षा ७ ऑक्टोबरनंतर तर नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा १२ ऑक्टोबरनंतर घेतली जाण्याची शक्यता आहे.
विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांमध्ये सुमारे ३ हजार ३०० विषय शिकविले जातात. या प्रत्येक विषयासाठी आवश्यक प्रश्नसंच तयार करण्यात उशीर होत आहे. त्यातच ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ , ५ व ९ ऑक्टोबर रोजी नेट परीक्षा आहे. तर ४ ऑक्टोबर रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाची आणि ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. यातील काही परीक्षांना विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे अनेक विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.
---------------------
परीक्षेचे वेळापत्रकच तयार नाही
ऑनलाईन परीक्षा घेण्यात तरबेज असणाऱ्या एजन्सीची अद्याप निवड झालेली नाही. निवड केल्या जाणाऱ्या एजन्सीला किती दिवसात परीक्षेचे नियोजन करता येऊ शकते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे विद्यापीठाने अद्याप परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. परिणामी विद्यापीठाला अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करावा लागणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.