मुहूर्त संपला; आता लग्नं लावणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:17 AM2021-08-17T04:17:18+5:302021-08-17T04:17:18+5:30
दोनशे वऱ्हाडींची मर्यादा : सरकारचे वरातीमागून घोडे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासनाने ‘सेकंड अनलॉक’मध्ये दोनशे लोकांच्या उपस्थितीत ...
दोनशे वऱ्हाडींची मर्यादा : सरकारचे वरातीमागून घोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाने ‘सेकंड अनलॉक’मध्ये दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याची परवानगी दिली खरी; मात्र लग्नकार्याचा हंगाम संपल्यानंतर आता काय उपयोग? असा सवाल बँडचालकांनी उपस्थित केला आहे. ऑगस्टपासून काढीव मुहूर्त आहेत. शक्यतो वधू-वराकडची मंडळी अशा मुहूर्तावर लग्नकार्य मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करतात. मग बँड वाजवणार कुठं आणि कसा? याकडे लक्ष वेधण्यात आलं आहे.
गेल्या दीड वर्षापासून लग्नकार्यावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलले. कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी झाल्यानंतर शासनाने पन्नास लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्यास परवानगी दिली. मात्र, इतक्या कमी लोकांमध्ये लग्न करायचे म्हटल्यास कोणत्या नातेवाइकाला बोलावयाचे, अशा पेचात अनेक कुटुंब पडली आणि वधू-वराकडील कुटुंबांनी नोंदणी पद्धतीने लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. सेकंड अनलॉकमध्ये शासनाने पुण्यातील कोरोना ‘पॉझिटिव्हिटी रेट’ कमी झाल्यानंतर मंगल कार्यालयांमध्ये शंभर आणि लॉंन्समध्ये दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्यास परवानगी दिली. यामुळे जोडप्यांसह कुटुंबांना दिलासा मिळाला असला तरी लग्नाचा हंगाम काहीसा ओसरला आहे.
काही जोडप्यांकडून काढीव मुहूर्तावर लग्नकार्य केले जात आहे. मात्र, त्याचे प्रमाण फार कमी आहे. लग्नाचा हंगाम आता थेट नोव्हेंबरनंतर सुरू होणार आहे. त्यामुळे शासनाने दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्यास परवानगी दिली असली तरी मंगल कार्य किंवा लॉन्स लग्नकार्यासाठी हाऊसफुल्ल होतील याची शक्यता कमी असल्याचे मंगल कार्यालयांच्या व्यवस्थांपकांकडून सांगण्यात आले आहे.
चौकट
आता काय उपयोग?
“लग्नसराईचा हंगाम संपला आहे. हंगाम संपल्यानंतर परवानगी देऊन काय उपयोग? आम्हाला तर सगळं मुद्दाम चालल्यासारखं वाटत आहे. गेली दीड वर्षे आमच्या हाताला काम नाही. लग्नकार्यात जर शंभर-दोनशेंनाच परवानगी असेल तर बॅण्डवाल्यांना बोलवायचे का? असा विचार वधू-वराकडची मंडळी करतात. आता जेवढी लग्न झाली त्यातही कुणी बॅण्ड बोलावला नाही. काढीव महूर्त काढून लग्नं होतात; पण त्यासाठी इतक्या लोकांना कुणी बोलावत नाही.”
-झहीर, दरबार बॅण्ड
चौकट
सध्या नोंदणी नाहीच
“लग्नकार्यासाठी सभागृहाच्या पन्नास टक्के क्षमतेनुसार उपस्थितीचा नियम आहे. आम्ही दीडशे लोक सहभागी करून घेऊ शकतो; पण शंभर लोकांनाच परवानगी देणार आहोत. आता तरी लग्नकार्याचा हंगाम नाही. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुन्हा तो सुरू होईल. सध्यातरी लग्नासाठी नोंदणी नाही.”
-प्रसाद दातार, मंगल कार्यालय चालक
चौकट
काढीव मुहूर्तावर पण...
“कोरोनामुळे जूनमधली बहुतांश लग्न पुढे ढकलली आणि ती लग्न काढीव मुहूर्तावर चातुर्मासात झाली. काढीव मुहूर्तावर लग्नकार्य होतात. परंतु थोडं पवित्र आणि अपवित्रचा मुद्दा विचारात घेतला जातो.”
-मोहन दाते, पंचागकार
चौकट
काढीव मुहूर्तांच्या तारखा
ऑगस्ट - २७, ३०, ३१
सप्टेंबर - १, ८, १६, १७,
ऑक्टोबर -८, १०, ११, १३, १४, १५, १८, १९, २०, २१, २४, ३०
नोव्हेंबर - ८, ९, १०, १२, १६