पालखी महामार्गाच्या दुरुस्तीला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:13 AM2021-09-23T04:13:55+5:302021-09-23T04:13:55+5:30
वाल्हे : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील खड्डे बुजवण्यास तसेच महामार्गाची दुरुस्ती करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला अखेर मुहूर्त मिळाला. ...
वाल्हे : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील खड्डे बुजवण्यास तसेच महामार्गाची दुरुस्ती करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला अखेर मुहूर्त मिळाला. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील, दौंडज खिंड ते निरा या २० किलोमीटरच्या रस्त्यावरील दौंडज खिंड, दौंडज, वाल्हे, कामठवाडी, पिसुर्टी, जेऊर फाटा, पिंपरे आदी गावांमधून जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. या मार्गावरून जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. त्यामधून काही वेळा अपघात घडले आहेत. दरम्यान, या पालखी महामार्गाची त्वरित डागडुजी करावी, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी तसेच स्थानिक नागरिक करत होते. खड्डे बुजवण्यात आली मात्र, पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्यांची दुरुस्ती करण्यास संबंधित ठेकेदार विसरला आहे. या नादुरुस्त साईडपट्ट्यांमुळे अपघाताची संख्या वाढणार आहे. या आधीही ठेकेदाराने या मार्गावर खड्डे पडलेले खड्डे बुजवले. मात्र, पुन्हा या मार्गावर खड्डे पडल्याने हे खड्डे बुजवण्यास संबंधित ठेकेदार नकार देत असल्याचा आरोप वाल्हे, कामठवाडी येथील नागरिकांकडून होत आहे. आधीच्या ठेकेदाराने बुजविलेले खड्डे पुन्हा पहिल्या खड्ड्यापेक्षा मोठे झाले आहेत. या राष्ट्रीय महामार्गाच्या डागडुजीच्या कामाच्या संदर्भातील अनेक तक्रारी वाल्हे येथील सरपंच अमोल खवले यांच्याकडे येथील ग्रामस्थांमधून येत असून, सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबतची माहिती, खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांना देणार असल्याचे, सरपंच अमोल खवले यांनी सांगितले.
फोटो : वाल्हे कामठवाडी (ता. पुरंदर) येथील पालखी महामार्गावरील पडलेले खड्डे. महामार्गाची खचलेली साईडपट्टी.