‘इयर एंडिंग’च्या मुहूर्तावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांची चंगळ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:12 AM2021-03-25T04:12:10+5:302021-03-25T04:12:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पालिकेच्यावतीने शहरभरात सुरू विकासकामांच्या बिलांच्या फायली दाखल करण्याची २५ मार्च ही शेवटची तारीख आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पालिकेच्यावतीने शहरभरात सुरू विकासकामांच्या बिलांच्या फायली दाखल करण्याची २५ मार्च ही शेवटची तारीख आहे. ही मुदत वाढवून देण्याची मागणी ‘माननीयां’नी केली आहे. ठेकेदारांकडून या फायली दाखल करून घेताना क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील कनिष्ठ अभियंता आणि सहायक अभियंत्यांची ‘चंगळ’ चालू झाल्याचे दिसत आहे.
फायलींवर सह्या करण्यासाठी ‘रुटीन प्रॅक्टिस’मधील टक्केवारी काही अधिकाऱ्यांनी घेतली. मात्र, काही अधिकाऱ्यांकडून अडवणूक करीत पैसे उकळण्यात आल्याचेही सांगण्यात आले. शहरातील क्षेत्रीय कार्यालय स्तरावर दुकान मांडलेल्या काही कनिष्ठ अधिकऱ्यांच्या या वर्तनावर वरिष्ठांचे कोणतेही नियंत्रण नसल्याची तक्रार केली जात आहे.
आर्थिक वर्षाचा शेवट होण्यास काहीच दिवस राहिल्याने अचानकपणे विकास कामांचा धुमाकूळ चालू झाला आहे. रस्ते खोदाई, मलवाहिन्या टाकणे, सुस्थितीतील पदपथ उखडून त्या जागी पेव्हर ब्लॉक बसविणे या प्रकारची कामे शहरभर सुरू झाली आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्याकडेची वाचनालये, बसथांबे, सुशोभित करण्याचा सपाटा सुरू आहे. ‘माननीयां’कडून होणाऱ्या विकासकामांना गेल्या वर्षभरात कोरोनामुळे खीळ बसली होता. मार्च महिन्याच्या पार्श्वभूमीवर ‘माननीयां’ना काही निधी उपलब्ध करून देण्यात आला. यातून सुमारे चारशे ते पाचशे कोटींची कामे येत्या काही दिवसांत शहरात होणार आहेत.
ही सर्व बिले महापालिकेला अदा करायची आहेत. या कामांची बिले काढण्यासाठी आवश्यक फाईल संबंधित विभागाकडे दाखल करण्याची शेवटची तारीख गुरुवारी (दि.२५) आहे. त्यामुळे फाईल दाखल करण्याची लगबग ठेकेदारांकडून सुरू आहे. त्याचा फायदा क्षेत्रीय कार्यालयांमधले अधिकारी उचलत असल्याची चर्चा आहे. विकासकामांवर लक्ष ठेवण्याची आणि त्या कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता आणि उपअभियंता यांची असते. कामे सुरू असताना यातले अनेक अधिकारी त्या ठिकाणी फिरकलेच नव्हते. आता हेच अधिकारी फायलींवर सह्या न करण्याची भूमिका घेत कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. या अधिकाऱ्यांना ‘खूश’ केल्यानंतर मात्र कामाचा दर्जा काहीही असला तरी लगेच सह्या मिळत असल्याचे सांगितले जाते. आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेतील कनिष्ठ दर्जाचे काही अधिकारीही ‘मार्च एंड’च्या पार्श्वभूमीवर ‘तुंबड्या’ भरून घेत असल्याचे चित्र आहे. यात कंत्राटी पद्धतीने भरलेले काही अभियंतेही मागे नाहीत.
चौकट
वरिष्ठांचीही हातमिळवणी?
वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने कंत्राटी अभियंतेही शिरजोर झाल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ केवळ ‘सह्या’जीराव आहेत की त्यांचीही यात हातमिळवणी आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. यातील काही जणांच्या बदल्या यापूर्वी करण्यात आल्या होत्या. मात्र, अनेकांसाठी थेट ‘मंत्रालया’तून फोन आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या सगळ्यात पुणेकरांच्या करातून होणाऱ्या विकासकामांचा दर्जा काय याचा विचार न केलेलाच बरा.