शहर हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने आणि हॉटेल्स सुरू करण्याचा निर्णय सोमवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 06:09 AM2017-08-25T06:09:22+5:302017-08-25T06:09:24+5:30
शहर हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने आणि हॉटेल्स सुरू करण्याच्या प्रश्नावर सोमवारी उत्तर मिळणार आहे. बंदी उठविण्यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढायचे की, न्यायालयाचा निर्णय ग्राह्य मानायचा याबाबत राज्याच्या विधी विभागाकडून सोमवारी (दि. २८) अभिप्राय दिला जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी गुरुवारी दिली.
पुणे : शहर हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने आणि हॉटेल्स सुरू करण्याच्या प्रश्नावर सोमवारी उत्तर मिळणार आहे. बंदी उठविण्यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढायचे की, न्यायालयाचा निर्णय ग्राह्य मानायचा याबाबत राज्याच्या विधी विभागाकडून सोमवारी (दि. २८) अभिप्राय दिला जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी गुरुवारी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार देशभरात १ एप्रिलपासून महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर असणारी मद्यविक्रीची दुकाने आणि हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत. अगदी शहर हद्दीतून जाणाºया राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर असणारी सर्व मद्यालये बंद झाली आहेत. या निर्णयाविरोधात काही विक्रेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सर्वोच्च न्यायालयानेदेखील हा निर्णय शहर हद्दीतील मद्यालयांना लागू नसल्याचा अभिप्राय ११ जुलै २०१७ रोजी दिला आहे. या निर्णयाचा आधार घेत पुणे रेस्टॉरंट्स अॅण्ड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांच्यासह पदाधिकाºयांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक वर्दे यांची भेट घेतली.
याबाबत माहिती देताना वर्दे म्हणाले, की राज्याचा विधी विभाग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वंकष अभ्यास करीत आहे. त्यानुसार शहर हद्दीतील रस्त्यांचा दर्जा बदलायचा की, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयच पुरेसा आहे यावर हा विभाग अभिप्राय देईल. सोमवारपर्यंत हा निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यानुसार शहर हद्दीतील मद्यालये केव्हा सुरू होतील, हे स्पष्ट होईल.