सोमवारी केवळ १८० कोरोनाबाधित, तर ७५१ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:30+5:302021-06-01T04:09:30+5:30
पुणे : पुणे शहरात सोमवारी विविध तपासणी केंद्रांवर केवळ ४ हजार ३४९ कोरोना संशयितांनी आपली तपासणी करून घेतली असून, ...
पुणे : पुणे शहरात सोमवारी विविध तपासणी केंद्रांवर केवळ ४ हजार ३४९ कोरोना संशयितांनी आपली तपासणी करून घेतली असून, यामध्ये अवघे १८० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ४.१३ टक्के आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तपासणीच्या तुलनेत प्रथमच कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या आत आला आहे.
दरम्यान, दिवसभरात ७५१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही आजमितीला ६ हजार २० इतकी खाली आहे. दिवसभरात ३३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहेत. आजचा शहरातील मृत्यूदर हा १.७५ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या १ हजार ५८१ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही ८४४ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २४ लाख ९६ हजार ७३७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६९ हजार ९२७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ५५ हजार ६५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात ८ हजार २५६ जणांचा मृत्यू झाला आहे.
-----------